Pranali Kodre
मँचेस्टमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून सुरू झाला.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी रिषभ पंत ३७ धावांवर असताना पायाला चेंडू लागल्याने रिटायर्ड हर्ट झाला. पण असे असले तरी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रिषभ पंतने ३७ धावांची खेळी करताना इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
त्यामुळे इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा पूर्ण करणारा तो सहावाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
रिषभ पंतच्या आता इंग्लंडमध्ये १३ सामन्यांमध्ये १०१८ धावा झाल्या आहेत. ज्यात ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (१५७५ धावा), राहुल द्रविड (१३७६ धावा), सुनील गावसकर (११५२ धावा), विराट कोहली (१०९६ धावा) आणि केएल राहुल (१०३५ धावा) यांनी इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
याशिवाय इंग्लंडमध्ये १००० धावा पूर्ण करणारा रिषभ पंत पहिलाच परदेशी यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच परदेशी यष्टीरक्षकाने इंग्लंडमध्ये कसोटी १००० धावा केल्या नव्हत्या.
इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी यष्टीरक्षकांमध्ये रिषभ पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (७७८ धावा) आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे रॉडनी मार्श (७७३ धावा) आहेत.