Pranali Kodre
भारतीय संघाला इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीतील पाचव्या दिवसाच्या (१४ जुलै) अखेरच्या सत्रात केवळ २२ धावांनी पराभूत केले. त्यामुळे ५ सामन्यांच्या मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली.
या सामन्यात पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी ३८७ धावा करत बरोबरी केली होती, पण दुसऱ्या डावात इंग्लंडने १९२ धावा करत भारताला १९३ धावांचे लक्ष्य दिले. पण भारताला १७० धावाच करता आल्या.
१९३ धावांचा पाठलाग करताना भारताने ११२ धावांवरच ८ विकेट्स गमावल्या होत्या, पण रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराहसोबत ९ व्या विकेटसाठी १३५ चेंडूत ३५ धावांची भागीदारी केली. पण बुमराह ५ धावांवर बाद झाला.
तरी नंतर जडेजाने मोहम्मद सिराजसोबत १० व्या विकेटसाठी ८० चेंडूत २३ धावांची भागीदारी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र सिराज ७५ व्या षटकात बशीरविरुद्ध दुर्दैवीरित्या बाद झाला.
या सामन्यात रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत झुंज देताना १८१ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या.
भारताच्या या पराभवावर मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली असून त्याने जडेजा, बुमराह आणि सिराजचे विशेष कौतुक केले.
सचिनने पोस्टमध्ये लिहिले की 'खूप जवळ आलो, पण तरी विजय दूर राहिला... जडेजा, बुमराह आणि सिराज यांनी अखेरपर्यंत जबरदस्त झुंज दिली. टीम इंडिया, चांगला प्रयत्न केला. इंग्लंडने चांगली कामगिरी करत दबाव ठेवला आणि त्यांना हवी तोच निकाल मिळवला. एका कठीण लढतीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.'