संतोष कानडे
छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू छत्रपती यांचे एक सरदार त्यांची भेट घेण्यासाठी साताऱ्यास आले होते. ही बातमी ऐकून हुजऱ्याने ताबडतोब शाहू महाराजांसमोर पागोटे धरले.
यावर छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सरदार आमच्या भेटीस येत आहेत की पागोट्याच्या? त्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या जवाहीरखान्यातील सर्व सोने खंड्या कुत्र्याच्या अंगावर चढवले.
खंड्या कुत्र्याला उंची पोशाखाने नटवलं आणि सरदाराच्या भेटीसाठी दरबारात पाठवून दिलं. या घटनेनंतर थोरल्या शाहू महाराजांनी कधीच भरजरी वस्त्रे परिधान केली नाहीत.
याशिवाय त्यांनी कधीही अलंकार घातले नाहीत आणि डोक्यावर पगडी धारण केली नाही. अत्यंत विरक्त आणि साधेपणाचं जीवन त्यांनी व्यतीत केलं.
थोरले शाहू महाराज आयुष्यभर विरक्तपणे जीवन जगले. सरसेनापती दाभाडे घराण्याच्या तळेगाव दाभाडे येथील राहत्या गढीमध्ये एक चित्र आहे. त्यात शाहू महाराजांनी डोक्यावर पगडी घातल्याचं दाखवलं आहे.
दाभाडे घराण्याचे वंशज सत्यशीलराजे दाभाडे यांनी शाहू महाराजांचं पगडी असलेलं चित्र जतन करुन ठेवलं आहे.
थोरल्या शाहू महाराजांच्या बागेमध्ये वाघ, चित्ता अशा हिंस्र प्राण्यांचाही समावेश होता. त्यांना श्वानांविषयी जास्त लळा होता.
शाहू महाराजांचा सर्वात लाडक्या श्वानाचं नाव खंड्या होतं. शाहू महाराज शिकारीला गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा खंड्यानेच त्यांचे प्राण वाचवले होते.
त्यानंतर खंड्याला पालखीचा मान प्राप्त झाला. खंड्यावर महाराजांचं जीवापाड प्रेम होतं. त्याच्यासाठी महाराजांनी पाच हजारांचे इनाम लाऊन दिले होते.