संतोष कानडे
18 मे 1682 रोजी रायगडाजवळ गांगवली येथे एक आनंदाची बातमी आली. महाराणी येसूबाईंच्या पोटी शाहू महाराजांचा जन्म झाला. स्वराज्याला आपला पुढील वारस मिळाला होता.
या शुभ आणि ऐतिहासिक क्षणी, संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव महाराज देहूवरून रायगडावर आले. त्यांनी बाळराजांना, म्हणजेच शाहू महाराजांना, आशीर्वाद दिला.
महादेव महाराजांच्या मनात एक मोठी इच्छा होती. त्यांना देहू ते पंढरपूर असा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू करायचा होता.
पण त्या काळात औरंगजेबाच्या मुघल सैन्यामुळे ही वारी सुरू करणे शक्य नव्हते. त्यांनी आपली ही व्यथा आणि अडचण छत्रपती संभाजी महाराजांसमोर मांडली.
शंभूराजांनी महादेव महाराजांचे म्हणणे ऐकून तात्काळ संमती दिली. त्यांनी आश्वासन दिले की स्वराज्याचे मावळे पालखी सोहळ्याला पूर्ण संरक्षण देतील.
संभाजी महाराजांनी लगेच दाभाडे, इंगळे आणि इतर प्रमुख सरदार व मावळ्यांना आदेश पाठवले. "वारीला कुठेही अडथळा येऊ देऊ नका," असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
फक्त संरक्षणच नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांनी पालखी सोहळ्यासाठी आर्थिक मदत देण्याचाही निर्णय घेतला. ही त्यांच्या भक्तीला आणि परंपरेला दिलेला राजाश्रय होता.
पुढे महादेव महाराजांचे धाकटे बंधू नारायण महाराजांनी इ.स. 1685 साली प्रत्यक्षात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. संभाजी महाराजांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.
संभाजी महाराजांच्या पाठिंब्यामुळेच तुकोबांची पालखी परंपरा सुरु झाली. हा भक्ती व शक्तीचा संगम आजही कायम आहे.