सकाळ डिजिटल टीम
चाफळ गाव सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्थित असून, ऐतिहासिक व धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामींनी श्रीरामाची मूर्ती येथे स्वतः स्थापून श्रीराम मंदिराची उभारणी केली होती. हे मंदिर प्राचीन असून, नंतर ते जीर्ण झाल्यावर १९७२ साली उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी याचे नूतनीकरण केले. चाफळ हे कवी यशवंत यांचे जन्मस्थान देखील आहे. गावाजवळील परिसरात समर्थांनी स्थापलेल्या ११ मारुती मूर्तींपैकी तीन मारुती मूर्ती आहेत.
धारेश्वर येथे महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथील पुजारी प्रामुख्याने जंगम व लिंगायत पंथातील आहेत. येथे एक गुहा आणि एक झरा देखील आहे. ही गुहा २०० फूट लांब, ३५ फूट रुंद आणि ७ फूट उंच आहे. समर्थांनी स्थापलेल्या ११ मारुती मूर्तींपैकी ३ या भागात आहेत. चाफळपासून १.५ किमी अंतरावर माजलगाव येथे रामदास स्वामींनी एक मारुती मूर्ती स्थापन केली आहे. पाटणपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेले नाईकबा मंदिर येथील शंकराच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.
बहूलेश्वर मंदिर हे पाटण तालुक्यात निसारे गावाजवळ सुमारे ३ मैल अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात स्थित आहे. हे प्राचीन मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून, धार्मिक श्रद्धा व स्थानिक लोकांच्या आस्थेचा केंद्रबिंदू आहे. स्थानिक कथेनुसार, बहूलेश्वर हे शिवरूप (रखवालदाराला) स्वप्नात दर्शन देऊन येथे शिवलिंग स्थापन करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली. मंदिर परिसर निसर्गरम्य आहे.
दातेगड किल्ला, ज्याला सुंदरगड असेही म्हणतात. हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर, जी संपूर्णपणे खडकात कोरलेली आहे. ही अनोखी विहीर स्थापत्यशास्त्र आणि कलेचे उत्तम उदाहरण मानली जाते. दातेगड किल्ल्याचा इतिहास फारसा प्रसिद्ध नसला, तरी त्याचे रणनीतिक स्थान आणि स्थापत्य वैशिष्ट्ये यामुळे तो अभ्यासक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचा आहे.
वांग नदी ही सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे, जी पाटण तालुक्यातून वाहते. तिचा उगम मराठवाडी येथे आहे आणि ती कोयना नदीला मिळते. वांग नदीवर मराठवाडी येथे धरण आहे, जे वांग मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचा एक भाग आहे. हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ ऋषी वाल्मिकींचे निवासस्थान आणि वांग नदीचा उगमस्थान म्हणून ओळखले जाते. जवळच धार्मिक नाईकबाबांचे स्थान आहे.
कोयना धरण हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हेळवाक गावाजवळ कोयना नदीवर बांधलेले एक अत्यंत महत्त्वाचे बहुउद्देशीय धरण आहे. हे धरण मुख्यतः जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे याला 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' म्हणून ओळखले जाते. कोयना धरण हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील खोल दरीत बांधण्यात आले आहे. धरणाजवळ वसलेले गाव कोयनानगर म्हणून ओळखले जाते. धरणाची उंची सुमारे १०३ मीटर आहे. येथे १३ मार्च १९९९ रोजी लेक टॅपिंग नावाचा दुर्मिळ आणि धाडसी प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला, ज्यामुळे धरणाची कार्यक्षमता अधिक वाढली
कोयना अभयारण्य हे पाटण तालुक्यात वसलेले एक घनदाट जंगल आणि जैवविविधतेने समृद्ध असे संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य कोयना धरणाच्या जलसाठा क्षेत्रात असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पसरलेले आहे. हे अभयारण्य १९८५ साली स्थापन करण्यात आले असून, याचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. येथे हरिण, बिबट्या, अस्वल, कोल्हा, रानडुक्कर, वाघ, तसेच मोर, बुलबुल, जंगली कोंबडी यांसारख्या अनेक वन्य प्राण्यांचे व पक्ष्यांचे वास्तव्य आहे. अभयारण्यात अनेक प्रकारची औषधी वनस्पती व मसालेदार झाडांचा साठा आहे. अभयारण्याच्या हद्दीतच प्रसिद्ध वसोटा किल्ला व शिवसागर जलाशय आहेत.