संतोष कानडे
शाह आलम दुसरा याचं मूळ नाव अली गौहर असं होतं. त्याचा शासनकाळ १७५९ ते १८०६ असा होता.
हाच काळ मुघल साम्राज्याच्या घसरणीचा काळ होता. मराठे आणि ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे मुघलांचा अस्त झाला.
शाह आलम दुसरा हा केवळ नावापुरता बादशहा होता. त्याच्याकडे प्रत्यक्ष फार कमी ठिकाणची सत्ता होती. त्याकाळी एक प्रचलित म्हण होती. सुलतान-ए-शाह आलम, अझ दिल्ली-ता-पालम.
म्हणजे शाह आलमची सत्ता दिल्ली ते पालम इतकीच होती. मराठ्यांनी या शाह आलम दुसरा याला चांगलाच जेरीस आणला होता.
शाह आलम दुसरा याला मराठ्यांसोबत करार करावा लागला. २७ डिसेंबर १७७० रोजी हा ऐतिहासिक करार झाला.
करारानुसार मराठ्यास बादशहाने खर्चासाठी म्हणून १० लाख रुपये द्यावेत. मराठ्यांनी त्याला गादीवर बसवावे. परंतु सूत्र मराठ्यांच्या हाती असतील.
मराठ्यांनी ठरवेल्या धोरणांना बादशहाने गपगुमान संमती द्यावी. पानिपताच्या युद्धापूर्वी मराठ्यांकडे ज्या कोणत्या जहागिऱ्या होत्या, त्या पुन्हा सुरु कराव्यात.
चौथाईची तुंबलेली बाकी द्यावी, बादशहाच्या शत्रूचे मराठ्यांनी पारिपत्य करावे आणि पुढील मोहिमा दोघांनी मिळून कराव्यात, या बाबी करारामध्ये अंतर्भूत होत्या.
मराठ्यांनी शाह आलम दुसरा याला केवळ एक मुघली बाहुला म्हणून गादीवर बसवलं होतं. सगळा कारभार मराठेच हाकत होते.