सूरज यादव
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१व्या वर्षी निधन झालं. दीड महिन्यांपूर्वी किडनीशी संबंधित आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.
शिबू सोरेन हे गुरुजी, दिशोम गुरुजी नावाने ओळखले जात होते. आदिवासींसाठी त्यांनी मोठं काम केलं.
एका सामान्य शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या शिबू सोरेन यांनी वडिलांच्या हत्येनंतर राजकारणात प्रवेश केला. ४० वर्षे झारखंड स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी संघर्ष केला.
झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर शिबू सोरेन तीनवेळा मुख्यमंत्री झाले. त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनीही मुख्यमंत्रीपद सांभाळलं.
शिबू सोरेन यांचे आजोबा इंग्रजांच्या काळात टॅक्स तहसीलदार होते. तर वडील सोबरन हे शिक्षक होते. परिसरात सर्वात शिकलेले आदिवासी अशी त्यांची ओळख होती.
शाळेत शिकत असतानाच शिबू सोरेन यांच्या वडिलांची हत्या झाली. यानंतर सोरेन राजकारणात उतरले. शिक्षणातला त्यांचा रस कमी झाला.
हजारीबाग इथं राहणारे नेत्यांच्या संपर्कात ते आले आणि कंत्राटदार म्हणून काम सुरू केलं. ग्रामपंचायत आणि विधानसभेची पहिली निवडणूक ते हरले होते.
१९८० पासून २०१४ पर्यंत ८ वेळा लोकसभेत दुमका मतदारसंघातून शिबू सोरेन खासदार म्हणून विजयी झाले होते. याशिवाय तीन वेळा राज्यसभेवरही गेले.
शिबू सोरेन तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. पण तिन्ही वेळा त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. यात त्यांना एका प्रकरणात तुरुंगातही जावं लागलं.