Yashwant Kshirsagar
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण महाराष्ट्रातील हवामान लहरी असल्याने अवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि प्रजेला पिण्याच्या पाण्याचा त्रास होत होता.
डॉ.अनिल सिंगारे यांनी 'सकाळ'मधील लेखात म्हटले आहे की, शिवाजी महाराजांनी इ. स. सन 1648 मध्ये खेड तालुक्यातील शिवापूर येथे शिवगंगा नदीवर मध्यम स्वरूपाच्या धरणाच्या निर्मितीचे नियोजन केले
पण नदी अडवून त्यावर धरणे बांधणे, हे तत्कालीन धर्ममार्तंडांना मान्य नव्हते. कारण वाहती नदी अडवणे घोर पातक आहे असा प्रचार त्यांनी केल्यामुळे नदीवर धरण बांधणे हे निषेधार्ह मानले जात होते.
तरीही शिवाजी महाराजांनी त्यांचा आदेश झुगारून प्रजेच्या हितासाठी शिवगंगा नदीवर धरणाची निर्मिती केली. हा शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण प्रयोग आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात ३२ धरणे बांधली.
गेली अनेक वर्षे दुष्काळ पडला तर खेड -शिवापुरच्या नागरिकांना याच पाण्याने जगवलं. अगदी दहा वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात देखील या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दूरदृष्टी दाखवली याचा आज आपल्या पिढीला ही फायदा होत आहे. आजही या धरणाचा लाखो लोकांना फायदा होत आहे.
जिजाऊंच्या सल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाड येथेही विहिरीची निर्मिती केली. बांधकामाच्या दृष्टिकोनातून या विहिरीचे बांधकाम मराठा शिल्पकलेचे उत्तम उदाहरण मानले जाते.