सकाळ डिजिटल टीम
श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात अनेक लोक मांसाहार टाळतात. यामागे धार्मिक परंपरा लर आहेतच, पण वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणेही आहेत. ती कोणती जाणून घ्या.
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या काळात उपवास आणि पूजा-अर्चा करून सात्विक राहण्याची परंपरा आहे. मांसाहार टाळणे हे आध्यात्मिक शुद्धतेचा भाग मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, या काळात मांसाहार टाळल्याने शरीर आणि मन शुद्ध होते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
पावसाळ्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते आणि पचनशक्ती मंदावते. मांसाहार पचायला जड असतो, त्यामुळे या काळात अपचन, गॅस किंवा इतर पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.
पावसाळ्याचा काळ अनेक प्राण्यांच्या प्रजननाचा असतो. या काळात त्यांना मारणे टाळले जाते, ज्यामुळे जीवसृष्टीचे संतुलन राखण्यास मदत होते. तसेच, समुद्रातही या काळात मासेमारी कमी होते, कारण माशांचा प्रजनन काळ असतो.
आयुर्वेदामध्ये पावसाळ्यात हलके, पचायला सोपे आणि सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. मांसाहार हा "तामसिक" श्रेणीत येतो, जो या काळात आरोग्यासाठी योग्य मानला जात नाही.
पूर्वीच्या काळी रेफ्रिजरेशनची सोय नव्हती. पावसाळ्यात मांस लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असे, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकत होत्या.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक ऋतूनुसार आहाराचे नियम ठरवले आहेत. श्रावण महिन्यात निसर्गात बदल होत असल्याने, त्यानुसार आहारातील बदल आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
मांसाहार टाळणे हे एक प्रकारचे आत्म-नियंत्रण आणि संयम शिकवते. यामुळे व्यक्तीला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते.