सकाळ डिजिटल टीम
श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय असून, या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात. या व्रतामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वे दडलेले आहेत. ती कोणती जाणून घ्या.
श्रावण महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात शिवशंकरांची पूजा, आराधना आणि व्रत केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे.
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शंकरांनी जगाचे रक्षण करण्यासाठी प्राशन केले. हे विष प्राशन केल्याने त्यांना दाह होऊ लागला, जो शांत करण्यासाठी देवतांनी त्यांना जलाभिषेक केला. ही घटना श्रावण महिन्यात घडल्याने या महिन्यात शिवशंकरांना जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे.
असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या आणि व्रत केले होते. यामुळे अविवाहित मुलींना चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत केले जाते, तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात.
सोमवार हा भगवान शंकरांचा प्रिय दिवस मानला जातो. चंद्राचा स्वामी देखील शिवशंभू असल्यामुळे सोमवारी त्यांची पूजा केल्याने चंद्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि मानसिक शांती मिळते.
श्रावणी सोमवारचे व्रत श्रद्धेने आणि नियमानुसार केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी धार्मिक मान्यता आहे. धनप्राप्ती, संतती, आरोग्य आणि सुखी जीवन यासाठी हे व्रत केले जाते.
या काळात उपवास केल्याने शरीराची आणि मनाची शुद्धी होते. यामुळे आध्यात्मिक प्रगती साधण्यास मदत होते आणि व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. अशी मान्यता आहे.
उपवास आणि धार्मिक विधींमुळे मन एकाग्र होते. यामुळे ताण कमी होतो, मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात.
श्रावणी सोमवारचे व्रत हे अनेक पिढ्यांपासून चालत आलेली एक पवित्र परंपरा आहे. हे व्रत केल्याने सांस्कृतिक मूल्यांचे जतन होते आणि कुटुंबात धार्मिक वातावरण टिकून राहण्यास मदत होते.