सकाळ डिजिटल टीम
नाशिकमधील पंचवटी येथे असलेली सीता गुंफा ही धार्मिक व ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या सीतागुफाचा रामायणाशी काय आणि कसा संबंध आहे जाणून घ्या.
सीता गुंफा ही रामायण काळाशी संबंधित आहे. असे मानले जाते की वनवासाच्या काळात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी येथे काही काळ वास्तव्य केले होते.
सीता गुंफा नाशिकच्या पंचवटी भागात आहे. पंचवटीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे, कारण याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातील काही वर्षे घालवली होती. पंचवटी नावाचा अर्थ 'पाच वटवृक्ष' असा आहे आणि हे प्राचीन वटवृक्ष आजही तिथे अस्तित्वात आहेत असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, याच परिसरात रावणाची बहीण शूर्पणखा राम आणि लक्ष्मणाला भेटली होती आणि लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते. या घटनेमुळेच रावणाने सीतेचे हरण करण्याचा कट रचल्याची मान्यता आहे.
असे म्हटले जाते की, शूर्पणखेचा प्रसंग घडल्यानंतर, जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले, तेव्हा सीता याच गुंफेत लपल्या होत्या, परंतु रावण त्यांना शोधून घेऊन गेला.
सीता गुंफा ही एक लहान आणि अरुंद गुहा आहे. गुहेत प्रवेश करण्यासाठी भक्तांना थोडे झुकून जावे लागते. हे याचे एक वैशिष्ट्य आहे.
गुहेच्या आत भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तसेच येथे एक पवित्र शिवलिंग देखील आहे, असे मानले जाते की सीता देवीनेच या शिवलिंगाची स्थापना केली होती.
गुहेच्या आतील शांत आणि पवित्र वातावरणामुळे येथे एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती मिळते. अनेक भाविक येथे पूजा आणि ध्यान करण्यासाठी येतात.
धार्मिक महत्वासह, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे सीता गुंफा नाशिकमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.