Mansi Khambe
धावपळीच्या जीवनात प्रेम आणि नातेसंबंध शोधणे थोडेफार कठीण झाले आहे. यामुळे अनेकजण जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग अॅप्सचा वापर करतात. अशातच आता 'स्पीड डेटिंग' हा नवा ट्रेंड समोर आला आहे.
स्पीड डेटिंगद्वारे अनेक लोक एकमेकांना थोड्या वेळासाठी भेटतात, बोलतात आणि ओळख करून घेतात. प्रत्येक जोडी काही मिनिटांसाठी संवाद साधते आणि मग पुढील व्यक्तीकडे जाते.
देशभरात तरुणांमध्ये स्पीड डेटिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. पण स्पीड डेटिंग म्हणजे काय? अविवाहित लोकांमध्ये ते का लोकप्रिय होत आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? हे जाणून घ्या.
स्पीड डेटिंग हा एक सामाजिक कार्यक्रम आहे. यामध्ये अनेक अविवाहित मुले आणि मुली एकाच ठिकाणी भेटतात. प्रत्येकाला कमी वेळात अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळते.
यामध्ये प्रत्येकाला एक कार्ड दिले जाते ज्यामध्ये याआधी भेटलेल्या व्यक्तीला पुन्हा भेटायचे असल्यास नावे लिहावी लागतात. जर दोन व्यक्ती एकमेकांचे नाव लिहितात तर आयोजक त्यांचा संपर्क शेअर करतो.
लोकांना व्यस्त जीवनशैलीतून वेळ वाचवत योग्य जोडीदार शोधणे. तसेच व्यक्तिमत्त्व समजून घेण्याची झटपट संधी मिळवून देणे हा आयोजकांचा मुख्य उद्देश आहे.
एखाद्या खास व्यक्तीशी जलद आणि थेट संपर्क साधायचा आहे त्यांच्यासाठी स्पीड डेटिंग हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच ऑनलाइन चॅटिंगवर विश्वास नाही आणि समोरासमोर संभाषणाला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी ही पद्धत फायदेशीर आहे.
कमी वेळात एखाद्याला नीट ओळखणे कठीण असते. कधीकधी लोक केवळ बाह्य स्वरूपाच्या आधारित निर्णय घेतात, ज्यामुळे खोल नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता कमी होते.