संतोष कानडे
मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलच्या बांधकामामागे उद्योगपती जमशेदजी टाटा यांची महत्त्वाकांक्षी कल्पना होती.
1890च्या दशकात मुंबईत भारतीयांना प्रतिष्ठेच्या काही युरोपीय हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याची पार्श्वभूमी होती.
त्यामुळे भारतीयांसाठीही जागतिक दर्जाचे आलिशान हॉटेल असावे, अशी टाटा यांची कल्पना होती.
ताज महाल पॅलेसच्या बांधकामाला 1898 मध्ये सुरुवात झाली. हे हॉटेल 3 डिसेंबर 1903 रोजी पाहुण्यांसाठी खुले करण्यात आले.
त्यावेळी हॉटेलमध्ये वीज, अमेरिकन पंखे, जर्मन लिफ्ट आणि तुर्की बाथसारख्या आधुनिक सुविधा होत्या.
हॉटेलच्या वास्तूमध्ये भारतीय, युरोपीय आणि इस्लामिक स्थापत्यशैलींचा सुंदर मिलाफ करण्यात आला.
समुद्राकडे तोंड असलेल्या या इमारतीने मुंबईच्या वास्तुशैलीत एक वेगळी ओळख निर्माण केली.
पुढे ताज महाल पॅलेस हे भारतातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक बनले.
त्यामुळे ताजची कहाणी केवळ एका हॉटेलच्या बांधकामाची नसून, भारतीय उद्योजकतेच्या महत्त्वाकांक्षेचीही कहाणी मानली जाते.