Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून २० फेब्रुवारीला भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने मोहिमेला सुरुवात केली.
भारतीय संघ यापूर्वी झालेल्या सर्व आठ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला असून चारवेळा फायनलही खेळला आहे, तसेच दोनवेळा विजेतेपद जिंकले आहे.
भारतीय संघाची आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी झाली आहे, हे जाणून घेऊ.
बांग्लादेशमध्ये झालेल्या १९९८ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत पोहचला होता. पण वेस्ट इंडिजविरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभव झाला.
केनियात झालेल्या २००० सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अंतिम सामना गाठला होता. पण अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला.
श्रीलंकेतील साल २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील फायनलमध्ये पावसाचा मोठा अडथळा आल्याने सामना रद्द झाला आणि त्यामुळे दोन्ही संघांना विभागून विजेतेपद देण्यात आले.
इंग्लंडमध्ये झालेल्या २००४ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ साखळी फेरीतूनच बाहेर झाला.
भारतात झालेल्या २००६ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले.
दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या २००९ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारतीय संघ साखळी फेरीतून बाहेर झाला.
इंग्लंडमध्ये झालेली २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी भारतासाठी अविस्मरणीय राहिली. भारताने फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत विजेतेपद जिंकले.
इंग्लंडमध्येच झालेल्या २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने फायनलमध्ये प्रवेश केला, पण पाकिस्तानने फायनलमध्ये पराभवाचा धक्का दिला.