आज मदर्स डेला तुमच्या आईसोबत पहा 'हे' सिनेमे

सकाळ डिजिटल टीम

आज मदर्स डे आहे. आजचा दिवस तुम्ही तुमच्या आईसोबत सिनेमा बघून एन्जॉय करण्याचा प्लॅन करत असाल तर हे पाच हिंदी सिनेमे नक्की बघा.

२०१२ साली रिलीज झालेला श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला इंग्लिश-विंग्लिश हा सिनेमा अफलातून आहे. गृहिणी असलेली श्री आपल्या मुलींसाठी इंग्रजी शिकते अशी गोष्ट या सिनेमाची आहे.

मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने केलेली धडपड आणि एका आईचं आयुष्य हे श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयातून उत्तम मांडलंय. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही पाहायलाच हवा.

झायरा वसीम, आमिर खान आणि मेहेर वीज यांची मुख्य भूमिका असलेला सिक्रेट सुपरस्टार हा आईसोबत बघता येईल असा मस्ट वॉच सिनेमा आहे.

गायक होऊ पाहणारी मुलगी आणि तिच्या स्वप्नांना नवऱ्याचा विरोध पत्कारून उभी राहणारी आई यांचा प्रवास खरंच खूप सुंदररित्या या सिनेमातून पाहायला मिळतो.

क्रिती सॅनॉनची मुख्य भूमिका असलेला मिमी हा देखील एक उत्तम सिनेमा आहे. सरोगसी, सिंगल पॅरेन्ट यावर भाष्य करणारा हा सिनेमा आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व नकळत अधोरेखित करतो.

आईपणाची ती भावना जाणून घेण्यासाठी आणि आपल्या आईला मनापासून थँक्स म्हणण्यासाठी हा सिनेमा नक्की बघा.

आयुषमान खुराना आणि नीना गुप्ता यांची मुख्य भूमिका असलेला 'बधाई हो' हा देखील असाच एक भन्नाट सिनेमा आहे. मुलं तरुण झाल्यावर आईची होणारी मनस्थिती, तिचा मानसिक गुंता या सिनेमातून नीना यांनी सुंदर मांडलाय.

तरुण मुलांची आई असलेल्या नीना प्रेग्नेंट झाल्यावर मुलांची होणारी चिडचिड आणि आईची मानसिक अवस्था समजल्यावर, तिची होणारी कोंडी लक्षात आल्यावर त्यांनी दिलेली साथ यावर हा सिनेमा भाष्य करतो.

आई तिच्या मुलीला त्रास देणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते याची गोष्टी २०१७ साली रिलीज झालेल्या मॉम या सिनेमात पाहायला मिळाली.

या सिनेमातील श्रीदेवी यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.