Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांचा जेष्ठ पुत्र छत्रपती संभाजी राजेही महापराक्रमी होते.
१ मे १६५९ रोजी संभाजी महाराजांचा जन्म झाला होता, ते १६७० पर्यंत भोसले घराण्यातील एकुलते युवराज होते.
शहाजी राजांनी ज्याप्रमाणे शिवरायांना राज्यकारभार आणि युद्धकलेच्या शिक्षणासाठी दोनवर्षे बंगळुरूला पाठवले होते, त्याचप्रमाणे संभाजी राजांनाही शिक्षण देण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला.
शिवरायांनी आपला पुत्र शंभू राजांना १६७० सालादरम्यान १३ वे वर्ष लागल्यावर प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला.
शिवरायांनी संभाजी राजांना प्रशासन, युद्धनीती, राजनीती, विद्या, कला अशा अनेक क्षेत्रात निपूण बनविण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले.
शंभू राजांना पुराणेतिहास, काव्यालंकार, संगीत, धनुर्विद्या शिकविण्याची जबाबदारी केशव पंडितांना देण्यात आली होती. त्यांच्याकडूनच शंभू राजांनी रामायण पुराण ऐकले. त्यांनी त्यांना वाड्.मयीन आणि व्यवहारोपयोगी असे शिक्षण दिले होते.
संभाजी राजांनी युद्धातील डावपेचांमध्ये तरबेज व्हावं म्हणून त्यांच्याकडे खानदेशाची सुभेदारीही सोपवण्यात आली होती. त्यावेळी सेनापती प्रतापराव गुजर आणि आनंदराव हे संभाजी राजांना घेऊन स्वारीवरही जायचे.
याबाबत ऍबेकॅरेने १६७२ सालच्या अहवालात उल्लेख केला आहे. त्याच्या अहवालात लिहिलंय की शिवरायांनी शूर दहा हजार सैनिकांचा विभाग संभाजी राजांच्या ताब्यात दिला होता. युवराज लहान असले तरी ते धैर्यवान आणि शिवरायांप्रमाणेच शूर आहेत.'
पुस्तक - महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड - भाग १ शिवकाल (इ. स. १६३०—१७०७)
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर (एम.ए., पीएच.डी)