Mansi Khambe
मुंबई, ठाणेसह राज्यभरात शनिवार, १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे, यावेळीही राजकीय पक्षांचे नेते दहीहंडी उत्सवात उत्साहाने सहभागी होत आहेत.
जन्माष्टमीनिमित्त, भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, मनसे यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी आणि संघटनांनी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांच्या बक्षिसांसह ‘दहीहंडी’ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून टेंभी नाका येथे दिघे साहेबांची मनाची हंडी (शिवसेना) आयोजित करण्यात येते. हि दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात महानगरपालिका शाळेचे मैदान, वर्तक नगर येथे ‘संस्कृतची हंडी’ आयोजित केली आहे. या दहिहंडीमध्ये २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर प्रथम नऊ थर रचणाऱ्या गोविंदा संघाला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
ठाणे येथील नौपाडा भागातील भगवती मैदान येथे मनसे नेते अविनाश जाधव यांनी दहीहंडी आयोजित केली आहे.
मुंबईतील घाटकोपर मधील श्रेयस सिग्नल जवळ भाजप नेते राम कदम यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठी दहीहंडी उभारल्याचा दावा केला आहे. यावेळी गोविंदा पथकाला रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार असून बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.
मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजप नेत्याच्या परिवर्तन इंडिया फाऊंडेशनतर्फे परिवर्तन दहीहंडी महोत्सव 2025 मध्ये लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठे नेते आणि अभिनेते सहभागी होणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकुम जकात नाका येथे साई जलाराम प्रतिष्ठान कडून आयोजित दहीहंडी महोत्सवात लाखो रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बोरिवली येथील मागाठाणे येथे शिवसेना नेते प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी आयोजित केली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मोठे नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.
शिवसेना उद्धव गटाचा दहीहंडी उत्सव वरळी येथील वीर जिजामातानगर येथील हनुमान मैदानात आयोजित केला जाणार आहे.
शिवसेना उद्धव गटाचे नेते अनिल परब हे वांद्रे येथे एका मोठ्या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.