सकाळ डिजिटल टीम
दया नायक यांचा जन्म कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील येनहोले गावात एका कोकणी कुटुंबात झाला. सातवीपर्यंत कन्नड माध्यमातून शिकलेले दया नायक यांना कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे मुंबईत काम करायला यावं लागलं.
वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी मुंबईत आले. येथे त्यांनी एका हॉटेलच्या कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून काम सुरू केले आणि रात्री हॉटेलच्या पायऱ्यांवर झोपायचे. मुंबईत कठीण परिस्थितीतही दया नायक यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.
हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांनी डी.एन.नगर येथील सीईएस कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. नंतर त्यांनी एमएससीपर्यंत शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा दिली आणि १९९५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक (PSI) म्हणून मुंबई पोलीस दलात रुजू झाले.
दया नायक यांची पहिली पोस्टिंग जुहु पोलिस स्टेशनला झाली. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम करताना त्यांनी अनेक एन्काउंटर केले. अंडरवर्ल्डच्या ८० हून अधिक गुंडांचा खात्मा दया नायक यांनी केला.
दया नायक यांनी आपल्या आईच्या नावाने कर्नाटकातील येनहोले गावात शाळा उघडली. या शाळेचे उद्घाटन सेलिब्रिटींद्वारे करण्यात आले. यामुळे चर्चेत आल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांच्या आय़ुष्यात फासे उलटे पडायला सुरुवात झाली.
दया नायक यांच्यावर २००६मध्ये अंडरवर्ल्डशी संबंध आणि बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली मकोका कायदा लावण्यात आला. त्यांना दोन महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. पण २०१० मध्ये मकोका हटवण्यात आला.
२०१२ मध्ये दया नायक यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात घेण्यात आलं. नागपूरला बदलीनंतर रुजू न झाल्याने २०१५ मध्ये त्यांचं पुन्हा निलंबन झाले. मात्र हा बदलीचा आदेशही रद्द झाला आणि ते पुन्हा कार्यरत झाले.
दया नायक ३१ जुलै रोजी पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. त्याआधी २९ जुलै रोजी त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती झाली आहे.