Sandip Kapde
बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. ते साताऱ्याच्या बाभुळगावचे सुपुत्र होते आणि रामोशी समाजातून पुढे आले होते. महाराजांचे ते अत्यंत विश्वासू गुप्तहेर होते.
शिमग्याच्या खेळात वेगवेगळी सोंगं वठवताना, किंवा लांडग्यांची शेपूटं आणताना शिवाजी महाराजांच्या लक्षात ते आले. सुरुवातीपासूनच ते स्वराज्याच्या सेवेत होते.
बहिर्जी नाईक वेषांतर करण्यात खूप कुशल होते. ते फकिर, भिकारी, संत, कोळी, वासुदेव अशा अनेक वेषांतून शत्रूच्या गोटात सहज वावरत. त्यांच्या वेषांतर कौशल्याची दखल स्वतः शिवाजी महाराजांनी घेतली होती.
शब्दांच्या जोरावर समोरच्याकडून हवी ती माहिती काढून घेणे, हे त्यांचे विशेष कौशल्य होते. त्यांनी विजापूर आणि आग्रा दरबारातूनही गुप्त माहिती आणली होती.
गुप्तहेर खात्यात त्यांची खास सांकेतिक भाषा होती. अनेक पक्षी आणि प्राण्यांचे आवाज काढून संदेश पोहोचवण्याचे त्यांचे अनोखे कौशल्य होते.
बहिर्जी नाईकांना शिवाजी महाराजांशिवाय इतर कोणीही ओळखू शकत नव्हते. त्यांची गुप्तता इतकी होती की, स्वराज्याच्या सैनिकांनाही त्यांच्यावर शंका यायची.
ते फक्त हेरच नव्हते, तर तलवारबाजी, दांडपट्टा आणि युद्धकौशल्यातही निपुण होते. शत्रूच्या छावणीत पकडले गेल्यास, त्यांच्याकडे सुटण्याचा मार्ग नेहमीच तयार असायचा.
चुकीच्या अफवा पसरवणे, दिशाभूल करणे आणि शत्रूला गोंधळवणे, हे त्यांचे गुप्त युद्धाचे तंत्र होते.
बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूची ठोस माहिती उपलब्ध नाही. पण एका आख्यायिकेनुसार, त्यांनी भूपाळगडावर महादेवाच्या चरणी प्राण सोडले.
सांगली जिल्ह्यातील भूपाळगडावर त्यांची समाधी आहे. कुंभारकिन्ही धरणाला 'बहिर्जी नाईक सागर' असे नाव देऊन त्यांच्या कार्याची आठवण आजही जपली जाते.