Anushka Tapshalkar
श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा काळ. या काळात बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या मिठाई पाहायला मिळतात. यातीलच एक पारंपरिक मिठाई विशेष लोकप्रिय आहे, ती म्हणजे घेवर.
हरियाली तीज आणि रक्षाबंधनसारख्या सणांमध्ये घेवर देणे-घेणे ही एक परंपरा बनली आहे. मात्र ही मिठाई केवळ चवीलाच नाही, तर आरोग्याला फायदेशीरही ठरू शकते, असं आयुर्वेद सांगतो.
आयुर्वेद आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट विपिन राणा यांच्या मते, घेवरचा उल्लेख 'आयुर्वेद महोदधि' या ग्रंथात ‘घृतपूर’ या नावाने केला गेला आहे. यामध्ये तूप आणि माव्याचा समावेश असल्याने ते शरीराला ऊर्जा देणारे आणि आरोग्यवर्धक मानले जाते.
घेवर हृदयाला बळकटी देणारे टॉनिक मानले जाते. कमजोर हृदयासाठी हे फायदेशीर असून, शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.
पावसाळ्याच्या हंगामात शरीरातील वात आणि पित्त दोष बिघडतात, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. घेवर या दोषांना संतुलित करण्यास मदत करते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.
आयुर्वेदानुसार, घेवर महिलांमध्ये होणाऱ्या जास्त रक्तस्रावाच्या समस्यांवर उपयुक्त ठरते. यामुळे शरीरातील ब्लड लॉस कमी होण्यास मदत होते आणि अशक्तपणा टाळता येतो.
बर्याच लोकांना पावसाळ्यात नैराश्य, थकवा आणि मूड स्विंगचा सामना करावा लागतो. घेवर यामध्ये सुधारणा घडवून आणतो, असं तज्ज्ञ सांगतात.
घेवरची प्रकृती 'गुरु' म्हणजेच जड असल्याने ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात आणि संतुलित पद्धतीनेच खाणं आवश्यक आहे. अति प्रमाणात घेवर खाल्ल्यास अपचन आणि जडपणा जाणवू शकतो.
घेवरमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असल्याने मधुमेह असणाऱ्यांनी यापासून दूर राहणं उत्तम. अन्यथा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढून त्रास होऊ शकतो.