संतोष कानडे
मुघलांनी त्यांच्या काळात अनेक अनोख्या प्रथा पाडल्या होत्या. प्रत्येक सम्राट काही ना काही आगळी प्रथा पाडायचा.
मृत्यूनंतर बदलेली बहुतांश नावे अरबी आणि पर्शियन (फारसी) भाषेतील असून, त्यांचा थेट संबंध 'स्वर्ग' (जन्नत) किंवा 'देवाचे सिंहासन' (अर्श) यांच्याशी जोडलेला असे.
मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याला मृत्यूनंतर 'फिरदौस मकानी' म्हणजेच 'स्वर्गात राहणारा' किंवा 'ज्याचा निवास स्वर्गात आहे' असे संबोधले गेले.
हुमायूंला मृत्यूनंतर 'जन्नत अशियानी' हे नाव मिळाले, ज्याचा अर्थ 'स्वर्गाचा रहिवासी' किंवा 'ज्याचे घर स्वर्गात आहे' असा होतो.
मुघल साम्राज्याचा सर्वात प्रभावशाली सम्राट अकबर याला मृत्यूनंतर 'अर्श अशियानी' म्हणजेच 'देवाच्या सिंहासनावर (अर्श) विराजमान असलेला' असे उच्च पदस्थ नाव देण्यात आले.
जहांगीरला 'जन्नत मकानी' आणि ताजमहाल बांधणाऱ्या शाहजहानला 'आला हजरत फिरदौस अशियानी' अशी पदवी देण्यात आली.
मृत्यूनंतर अशी नावे देण्यामागे केवळ धार्मिक कारण नव्हते, राजघराण्याचे दैवीकरण करणे आणि जनमानसात सम्राटाची प्रतिमा 'पवित्र' आणि 'अमर' करणे हाही यामागील एक मोठा राजकीय हेतू होता.
मुघल सम्राटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मूळ नावाचा आदरपूर्वक उच्चार टाळण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला परलोकात सर्वोच्च स्थान मिळावे, या हेतूने ही नवीन नावे दिली जात असत.
सम्राटाच्या मृत्यूनंतर त्याचे वर्णन करताना शाही फर्माने, दरबारी इतिहास आणि पुढील सम्राटांच्या आत्मचरित्रात केवळ याच मृत्यूनंतरच्या नावांचा अधिकृत वापर केला जाई.
ही प्रथा केवळ मुघलांपुरती मर्यादित नव्हती; प्राचीन चीन, जपान आणि इस्रायलसारख्या संस्कृतींमध्येही राजांच्या मृत्यूनंतर त्यांना 'मरणोत्तर नावे' देण्याची पद्धत अस्तित्वात होती.
मुघल काळातील ही प्रथा तत्कालीन राजेशाही शिष्टाचार, भाषेवरील प्रभुत्व आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या त्यांच्या धार्मिक संकल्पनांवर अचूक प्रकाश टाकते.