पुजा बोनकिले
थंडीच्या दिवसांत सर्दी खोकला होणे हे अगदी सामान्य आहे. काही घरगुती उपायही ही समस्या कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतात.
चहा औषधी असेल तर त्याचा सर्दी कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होईल. आता औषधी म्हणजे काय तर चहा पावडरबरोबरच गवती चहा, आले, तुळशीची पाने, पुदिना, काळीमिरी आणि लवंग घातल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. यामध्ये दूध न घालता चहा प्या.
सर्दी झाल्यास दिवसातून तीन-चार वेळा गरम पाणी प्या. यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते. याशिवाय गरम पाण्यात मीठ टाकून त्याने गुळण्या केल्यास घशाला झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कोमट पाण्याच्या सकाळ-संध्याकाळ गुळण्या करा.
सर्दी आणि घशाच्या समस्येसाठी हळद दूध हा उत्तम उपाय आहे. सर्दी झालेली असताना रात्री झोपण्यापुर्वी गरम दुधात हळद प्यायल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पण हे प्यायल्यानंतर पाणी पिऊ नये.
विविध भाज्यांचे सूप शरीराचे पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. गरम असल्याने घशालाही आराम मिळतो. लसूण हा आरोग्याच्या अनेक तक्रारींसाठी चांगला असतो. सर्दीसाठीही लसूण उपयुक्त असतो. लसणाच्या पाकळ्यांची साले काढून त्या बारीक करून पाण्यात घालून उकळाव्यात. हे पाणी गाळून प्यायल्याने सर्दी कमी होण्यासाठी नक्कीच उपयोग होतो.
भारतीय मसाल्यांमधील बहुतांश पदार्थ हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामध्ये वेलचीचाही समावेश आहे. गोड पदार्थांमध्ये वापरली जाणारी ही वेलची सर्दीसाठीही उपयुक्त ठरते. वेलचीची पूड घेऊन त्यात मध घालून त्याचे चाटण करावे. हे चाटण दिवसभरातून नियमित खाल्ल्यास त्याचा सर्दी कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होतो.
weather change health
Sakal