सकाळ डिजिटल टीम
आजच्या काळात कंडोम हा एक सामान्य आणि सहज उपलब्ध असणारा उत्पाद आहे. परंतु, तुम्हाला हे माहितीये का, की जगातील सर्वात महागडा कंडोम इतका महाग आहे की त्या पैशांत तुम्ही जवळपास ५ ग्रॅम सोने खरेदी करू शकता?
हा अनोखा आणि ऐतिहासिक कंडोम तब्बल २०० वर्ष जुना आहे. विशेष म्हणजे, हा कंडोम कोणत्याही आधुनिक कंपनीने बनवलेला नाही, तर हाताने तयार करण्यात आलेला आहे. अलीकडेच, अॅमस्टरडॅम येथील एका लिलावात याची विक्री झालीये.
फ्रान्समध्ये सापडलेला हा दुर्मीळ कंडोम लिलावात सुमारे ४४ हजार रुपयांना विकला गेला. त्याची लांबी १९ सेमी (सुमारे ७ इंच) होती.
हा कंडोम मेंढ्यांच्या आतड्यांपासून तयार करण्यात आला होता. १८ व्या शतकात डुक्कर, बकरी आणि वासरांच्या आतड्यांपासूनही असेच कंडोम तयार केले जात असत.
त्या काळात असे कंडोम तयार करणे केवळ एक गर्भनिरोधक साधन नव्हते, तर कलाकृती मानली जात असे. पूर्णपणे हाताने तयार करणे हे मोठ्या कौशल्याचे काम होते.
आजच्या काळात अनेक कंपन्या कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेचे कंडोम बाजारात आणतात; पण त्या काळात अशा प्रकारच्या कंडोमसाठी भरपूर खर्च करावा लागे. आजही या कंडोमची किंमत पाहता त्या रक्कमेवर अनेक जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील.
महागड्या कंडोमची किंमत केवळ ब्रँड किंवा पॅकेजिंगवर आधारित नसते. तर त्याच्या रचनेत, गुणवत्तेत आणि ऐतिहासिक मूल्य यामध्ये त्याचे खरे महत्व असते.