Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत १९ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सला केवळ २ धावांनी पराभूत केले. पण याच सामन्यात राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला.
वैभवने ज्यावेळी या सामन्यातून पदार्पण केले, त्यावेळी त्याचे वय १४ वर्षे २३ दिवस होते.
त्यामुळे वैभव आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदर्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ. या यादीत पहिल्या क्रमांकावर वैभव आहे.
पाचव्या क्रमांकावर प्रदीप सांगवान असून त्याने २००८ मध्ये दिल्लीकडून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १७ वर्षे १७९ दिवस वय असताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
चौथ्या क्रमांकावर रियान पराग असून त्याने राजस्थान रॉयल्सकडून १७ वर्षे १५२ दिवस वय असताना २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुजीब उर रेहमानने १७ वर्षे ११ दिवस वय असताना २०१८ साली पंजाब किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते.
दुसऱ्या क्रमांकावर प्रयास रे बर्मन असून त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २०१९ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १६ वर्षे १५७ दिवस वय असताना पदार्पण केले होते.