Independence Day Special: भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील १० महत्वाच्या गोष्टी

रफिक पठाण

१८५७ चा उठाव: ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात एकत्रितरित्या केला गेलेला पहिला उठाव १८५७ मध्ये झाला . १० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. या बंडाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई, बहादुरशाह जफर, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, मंगल पांडे यांनी केले. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला.

१८५७ चा उठाव

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना: काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या स्थापनेमुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला एक संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

बंगालची फाळणी: लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय कॉंग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.

बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.

बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात. १२ डिसेंबर १९११ रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरविलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली.

बंगालची फाळणी

महात्मा गांधींचे परदेशातून भारतात आगमन:

इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. गांधीनी १९२०मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. यापुढे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अहिंसेच्या मार्गाने अनेक चळवळी उभ्या करत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली.

महात्मा गांधींचे परदेशातून भारतात आगमन

जालियनवाला बाग हत्याकांड: बंगालच्या फाळणीच्या निर्णयापासूनच देशभरात स्वातंत्र्याची ठिणगी पडायला सुरवात झाली होती. देशभरात इंग्रजांविरुद्ध एक मोठं आंदोलन उभं राहत होतं. या आंदोलनामुळे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रज बंदी बनवत किंवा त्यांना मृत्युदंड देत असत. १३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. यामध्ये शेकडो लोकं मृत्युमुखी पडले.

जालियनवाला बाग हत्याकांड

खिलाफत चळवळ:

पहिल्या महायुद्धात तुर्कीस्थान या मुस्लिम राष्ट्राचा पराभव होऊन त्याचे अनेक तुकडे पडण्याची भीती निर्माण झाली होती. तुर्कीस्थानच्या सुलतानचा हा अपमान भारतातील धर्मनिष्ठ मुस्लिमांना सहन झाला नाही. त्यांनी तुर्कीस्थानमध्ये मुस्लिमांवर इंग्रजांकडून होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवायला सुरवात केली.

म. गांधीजीनी मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचा व असहकार चळवळीला मुसलमानांचा पाठींबा मिळविण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीलाच गांधीजीनी खिलाफत आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर करून टाकला. २४ नोव्हेंबर १९१९ रोजी म. गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे ' अखिल भारतीय खिलाफत काॅन्फरन्स ' भरविण्यात आली. हिंदुनी खिलाफत चळवळीला तन-मन-धनाने मदत करावी असे गांधीजीनी हिंदुना आवाहन केले. या चळवळीमुळे देशभरातील नागरिकांना एकत्र आणण्यात गांधीजींना यश आले होते.

खिलाफत चळवळ

दिल्ली विधानसभा बॉम्बस्फोट कट: देशभरातील युवकांमध्ये देशाच्या स्वातंत्र्याची आग पसरायला सुरवात झाली होती. ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या विधानसभा परिसरात दोन बॉम्ब फेकले. बॉम्बच्या धुरामुळे संपूर्ण हॉल भरून गेला होता. त्यांनी त्या परिसरात इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत इंग्रजांच्या भारतीय संरक्षण कायद्याला विरोध करणारी पत्रके फेकायला सुरवात केली. त्यांनी या कृतीतून लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा निषेध देखील नोंदवला. या स्फोटात काही लोक जखमी झाले, पण कुणाचाही मृत्यू झाला नाही. भगतसिंग व बटुकेश्वर दत्तानी हे जाहीर केले कि हे कृत्य नियोजित होते व स्वतःला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

दिल्ली विधानसभा बॉम्बस्फोट कट

सविनय कायदेभंग चळवळ: महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या. सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. यातूनच पुढे मिठाचा सत्याग्रह, सरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार, परदेशी मालाची होळी, करबंदी देशात होऊ शकली.

सविनय कायदेभंग चळवळ

आजाद हिंद सेनेची स्थापना: आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते.

आजाद हिंद सेनेची स्थापना

भारत छोडो आंदोलन: चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट १९४२ मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले. या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ८ ऑगस्ट १९४२ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत छोडो आंदोलन