Anushka Tapshalkar
दिवाळी म्हटलं की घराची स्वच्छता, फराळाची तयारी आणि नवीन कपड्यांसोबत दागिन्यांचीही लगबग सुरू होते. लक्ष्मीपूजन असो किंवा दिवाळी पाडवा, सणासुदीच्या दिवशी सोन्याचे दागिने घालण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. मात्र, वर्षभर वापर न केलेले किंवा सतत अंगावर असलेले सोन्याचे दागिने अनेकदा निस्तेज दिसू लागतात. घाम, धूळ, तेल आणि मेकअपच्या अवशेषांमुळे दागिन्यांवर मळ साचतो आणि त्यांची नैसर्गिक चमक कमी होते.
अशावेळी दागिने स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक वेळी सोनाराकडे जाण्याची गरज नसते. काही साध्या पद्धतींनी घरच्या घरी दागिन्यांवरील हलका मळ साफ करता येऊ शकतो. मात्र, सोन्याचे दागिने स्वच्छ करताना योग्य काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी दोन सोपे उपाय.
दागिन्यांवर बारीक धूळ किंवा घाण साचली असेल, तर मऊ ब्रिसल्स असलेला ब्रश वापरता येतो. ब्रश किंचित ओला करून दागिन्यांच्या पृष्ठभागावर हलक्या हाताने फिरवा. विशेषतः चैनमधील बारीक कड्या, बांगड्यांचे नक्षीकाम आणि रिंगच्या आतील भागाची स्वच्छता करताना काळजी घ्या. स्वच्छतेनंतर दागिने पाण्याने धुऊन कोरड्या मऊ कापडाने पुसून घ्या.
सोन्याच्या साध्या दागिन्यांवरील धूळ आणि तेलकटपणा काढण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात काही थेंब सौम्य लिक्विड साबण मिसळा. आता या मिश्रणात सोन्याचे दागिने काही मिनिटे ठेवा. त्यानंतर मऊ ब्रशच्या मदतीने दागिन्यांच्या कोपऱ्यांमध्ये साचलेला मळ अलगद साफ करा. शेवटी स्वच्छ पाण्याने दागिने धुऊन मऊ सुती कापडाने पूर्णपणे कोरडे करा.
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट, बेकिंग सोडा, हळद किंवा इतर घासणारे पदार्थ वापरणे टाळा. यामुळे दागिन्यांवर ओरखडे पडू शकतात.
हिरे, मोती किंवा इतर मौल्यवान रत्ने जडवलेले दागिने घरच्या घरी गरम पाण्यात स्वच्छ करू नका.
गोल्ड प्लेटेड दागिने जास्त वेळ पाण्यात ठेवू नका किंवा ब्रशने जोरात घासू नका.
दागिन्यांवर डाग, रंगबदल किंवा पॉलिश निघाल्याची लक्षणे दिसत असल्यास सोनाराकडून तपासणी करून घ्या.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.