Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Anushka Tapshalkar

Early Grey Hair Warning: वय वाढल्यानंतर केस पांढरे होणं ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. मात्र, वीस-पंचवीशी किंवा तिशीच्या आतच केस पांढरे होऊ लागले, तर त्यामागे फक्त ताणतणाव किंवा अनुवांशिक कारणंच असतील असं नाही. काही वेळा शरीरातली व्हिटॅमिनची कमतरता, थायरॉइडचा त्रास, अॅनिमिया किंवा इतर आरोग्य समस्या यामुळेसुद्धा केस लवकर पांढरे होऊ शकतात. त्यामुळे ही समस्या वारंवार जाणवत असेल आणि त्यासोबत इतर शारीरिक लक्षणंही दिसत असतील, तर ती दुर्लक्षित करू नका. जाणून घेऊया, कमी वयात केस पांढरे होण्यामागे कोणते ५ आजार कारणीभूत ठरू शकतात.

१. व्हिटॅमिन B12 ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी असल्यास केसांचे आरोग्य बिघडू शकते. केस कमकुवत होणे, अकाली पांढरे होणे यासोबतच सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि चक्कर येणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

२. थायरॉइडचा त्रास

थायरॉइड हार्मोन्सचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम केसांवर होतो. हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असलेल्या व्यक्तींमध्ये केस गळणे, कोरडे होणे आणि लवकर पांढरे होण्याची समस्या आढळू शकते.

३. आयर्नची कमतरता (अॅनिमिया)

रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे केसांच्या मुळांचे पोषण कमी होते आणि केस कमकुवत होण्याबरोबरच अकाली पांढरे होण्याची शक्यता वाढते.

४. व्हिटिलिगो (कोड)

व्हिटिलिगो या त्वचारोगामध्ये त्वचेतील रंगद्रव्य कमी होते. हा परिणाम जर टाळूवर झाला, तर त्या भागातील केसांचा नैसर्गिक रंगही बदलू शकतो आणि ते पांढरे दिसू लागतात.

५. सततचा मानसिक ताण

दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास शरीरातील मेलॅनिन तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. मेलॅनिन हे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवणारे रंगद्रव्य असल्याने त्यात घट झाल्यास केस अकाली पांढरे होऊ शकतात.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर कमी वयात अचानक मोठ्या प्रमाणात केस पांढरे होऊ लागले, केस गळण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यासोबतच सतत थकवा, अशक्तपणा, वजनात अनपेक्षित चढ-उतार, त्वचेतील बदल किंवा इतर शारीरिक तक्रारी जाणवत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञ किंवा फिजिशियन यांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य तपासण्या करून मूळ कारण शोधलं तर त्यावर प्रभावी उपचार करता येऊ शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.