भारतामध्ये लोक मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करतात. मात्र ट्रेनमधून प्रवास करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही नियम बनवले आहेत, ते सर्वांना बंधनकारक आहेत.
अनेकदा प्रवासी हे नियम मोडतात आणि मग त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेकदा प्रवासी कोणतीही आपात्कालीन परिस्थिती उद्भवली नसताना पुलिंग चैन ओढतात. परंतु असं करणं दंडणीय अपराध आहे.
रेल्वे अधिनियम कलम 141 नुसार असं करताना आढळल्यास त्याला एक हजार रुपये दंड तसेच एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
ट्रेनमधून प्रवास करतेवेळी पेट्रोल, फटाके, गॅस सिलिंडर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ नेणं दंडणीय अपराध आहे.
असं करताना आढळल्यास संबंधित प्रवाशाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
याशिवाय रेल्वेमध्ये किंवा रेल्वे स्टेशन परिसरात धुम्रपान करणं कायद्यानं गुन्हा आहे. असं करताना आढळल्यास 200 रुपये दंड होऊ शकतो.
ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणं दंडनीय अपराध आहे. असं करताना आढळल्यास दंड भरावा लागतो.