सकाळ डिजिटल टीम
खेड : चिपळूण तालुक्यातील (Chiplun) डेरवण येथील वालावलकर रुग्णालय आणि परिसराला निसर्गसौंदर्य लाभलेले आहे. डेरवणचे धरण (Dervan Dam) आणि तेथे उभारण्यात आलेली शिवसृष्टी हे सारेच अविस्मरणीय आहे.
या ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडासंकुलाच्या परिसरात सुमारे ३५ हून अधिक प्रकारचे पक्षी आढळत आहेत. ही पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणीच आहे.
या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये काळा कस्तूर, सातभाई, राखाडी कोतवाल, कबरा गप्पीदास, कृष्णपाठी सुतार, तुरेवाला गरूड, मलबारी धनेश, किरमीजी शिंजीर, शिक्रा, ठिपकेदार मनोली, नारंगी गोमेट, छोटा खंड्या, नवरंग, मोरघार.
सुभग, जांभळा सूर्यपक्षी, माडगरूड, ककनेर, तिबोटी खंड्या, ब्राह्मणी घार, रानकोंबडी, हरियाल (महाराष्ट्राचा राज्यपक्षी) असे विविध पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याची संधी पक्षी निरीक्षकांना मिळत आहे.
चिपळूण तालुक्यातील डेरवणमध्ये भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयाच्या परिसरात रुग्णसेवेचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
या रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि क्रीडासंकुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
निसर्गाच्या विविधतेला कुठेही बाधा न पोहोचवता संस्थेने या साऱ्या विश्वाची उभारणी केली आहे. या ठिकाणी असलेले डेरेदार वृक्षसंपदेकडे विविध प्रजातीचे पक्षी आढळून येत आहेत.
सिमेंट काँक्रिटच्या जंगलात पक्ष्यांना हक्कांचा निवारा मिळणे कठीण आहे. तो निवारा त्यांना या ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे विविध प्रजातीचे रंगीबेरंगी दुर्मिळ पक्षी, फुलपाखरे येथे आढळून येऊ लागली आहेत.
वेगवेगळ्या मोसमात येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत पक्षी येत असतात. ते काही काळ इथे राहतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांना ते पाहण्याची संधी येथे मिळते. या शिवाय तळकोकणात आढळणारी पक्ष्यांची विविधता या ठिकाणी आता पाहायला मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.