सकाळ वृत्तसेवा
लखनौच्या झूलेलाल वाटिकेत ‘मनौतियों के राजा’ गणेशोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. यंदा या उत्सवाचं २१वं वर्ष असून, तब्बल १२ दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे.
उत्सवादरम्यान दररोज सुमारे १५ ते २० हजार भाविक येण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन पंडाल आणि परिसरासाठी तब्बल २० कोटी रुपयांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आला आहे.
भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी ६० महिला आणि पुरुष बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात टीन शेडसह हाय-रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.
यंदाच्या उत्सवासाठी सुमारे ८० फूट उंचीचा पंडाल उभारण्यात आला आहे. न्यू जर्सीतील स्वामीनारायण मंदिराच्या धर्तीवर प्रवेशद्वाराची रचना करण्यात आली असून, कोलकत्त्याहून आलेल्या ५० ते ६० कारागिरांनी महिनाभर मेहनत घेतली आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या धर्तीवर यंदाची सहा फूट उंच गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. आकर्षक सजावटीमुळे बाप्पाचं हे रूप भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
‘मनौतियों के राजा के नाम चिट्ठी’ हा उत्सवातील खास उपक्रम आहे. भाविक आपल्या अडचणी, इच्छा आणि मनोकामना चिठ्ठीत लिहून बाप्पापर्यंत पोहोचवू शकतात. हा उपक्रम दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
भाविकांना सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. दररोज सकाळी ९ आणि सायंकाळी ६ वाजता महाआरती होईल. कानपूरहून दररोज ताजे मोदक आणले जाणार असून, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल, पाळणे आणि महिलांसाठी ‘मीना बाजार’ही असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.