Pune Ganeshotsav : पुण्यात मानाच्या गणपतींचं कधी विसर्जन?

सकाळ डिजिटल टीम

विसर्जन मिरवणूक दिमाखात होणार

पुणे : दहा दिवस वातावरणात चैतन्य आणलेल्या गणरायाला (Pune Ganeshotsav) आता निरोप देण्याची वेळ आली आहे. गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होणार आहे. ही विसर्जन मिरवणूक दिमाखात आणि वैभवशाली पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वच गणेश मंडळे सज्ज झाली आहेत.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ

मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक लाकडी रथातून निघणार आहे. यामध्ये समर्थ ढोल-ताशा पथक, रमणबाग ढोल-ताशा पथक आणि श्रीराम ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत. तसेच, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर होतील.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

यंदा श्री गणाधीश रथामध्ये मंडळाचे गणराय विराजमान होणार असून, आकर्षक विद्युत रोषणाईने रथ उजळून निघणार आहे. भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी रथ सुसंगत आहे. रथावर आठ गजस्तंभ असून, भगवान शंकरांच्या आठ गणांच्या मूर्ती आणि हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मंडळ यंदा दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

अखिल मंडई गणपती मंडळ

मंडळाची विसर्जन मिरवणूक भव्य अशा ‘विश्वगुरू’ रथातून निघणार आहे. स्वामी समर्थांची १० फूट उंचीची मूर्ती रथावर असून, श्री दत्त महाराजांचे त्रिमिती (थ्रीडी) पेंटिंग रथावर साकारले आहे. ३० फूट उंची आणि १५ फूट रुंदी असलेल्या या रथाची लांबी २१ फूट आहे. रथामध्ये हायड्रोलिक तंत्राचा वापर केला आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन आणि त्यामागे गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक, नादब्रह्म ढोल-ताशा पथक ट्रस्ट सहभागी होतील.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

मानाचा पहिला गणपती - ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ

मुख्य विसर्जन मिरवणुकीची वेळ कमी व्हावी, यासाठी श्री कसबा गणपती मंडळ आपली मिरवणूक दरवर्षीपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र मिरवणूक कमी असली, तरी तेच वैभव, तोच दिमाख जपला जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून रमणबाग प्रशाला, रूद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथक, ही तीन पथके सहभागी होणार आहेत. तसेच नगारखाना, प्रभात बँड, कामयानी प्रशाला आणि बँक ऑफ इंडिया या दिंड्या सहभागी होणार आहेत.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

मानाचा दुसरा गणपती - ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ

सकाळी नऊ वाजता जोगेश्वरी चौकातील उत्सव मांडवात श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान होईल. १०.३० वाजता टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीत मंडळ सहभागी होईल. सतीश आढाव यांचे नगारावादन, पारंपरिक पोशाखातील अश्वारूढ कार्यकर्ते, न्यू गंधर्व ब्रास बँड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होतील. शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने तयार केलेल्या खास शिवराज्याभिषेक रथाचे सादरीकरणही मिरवणुकीत होणार आहे.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती मंडळ

मंडळाच्या श्रींची मिरवणूक स्वप्नील व सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी तयार केलेल्या ‘जय श्रीराम-रामराज्य’ या फुलांच्या आकर्षक रथातून निघणार आहे. या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व ब्रास बँड, फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेचे सैनिक प्रात्यक्षिके व ढोल-ताशा पथक, नादब्रह्म ढोल-ताशा पथक आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती मंडळ

विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळ महाकाल रथाची सजावट करणार आहे. रथ २८ फूट उंच असून फुलांनी सजवलेली १२ फूट उंचीची महाकालची पिंड, हे आकर्षण असणार आहे. उंचीला मर्यादा असल्याने मंडळ पहिल्यांदाच ‘हायड्रोलिक’चा वापर करणार आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी उज्जैनच्या अघोरी महाराज यांचा सहभाग असेल. मिरवणुकीत लोणकर बंधूंचे नगारावादन आणि स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी व शिवप्रताप वाद्य पथके सहभागी होणार आहेत.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk

मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती मंडळ

केसरीवाडा गणेश मंडळाचे गणराय रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत विराजमान असतील. मिरवणुकीत बिडवे बंधू यांचे नगारा वादन, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, श्रीराम ढोल-ताशा पथक आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत. तसेच इतिहास प्रेमी मंडळातर्फे ‘चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2023 Ganpati Visarjan Miravnuk