

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : जागतिक स्तरावर ४६ टक्के लोकांना त्यांना उच्च रक्तदाब आहे, हे माहीत नसते. उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांपैकी अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे निदान आणि उपचार केले जाते. पाचपैकी केवळ एक प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब हा नियंत्रणात असतो. त्यामुळे ८० टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अनियमित हृदय-ठोके आणि मूत्रपिंडाचे नुकसान यांसह गुंतागुंत होण्याचा धोका असतो. नुकताच जागतिक रक्तदाब दिन १७ मे रोजी झाला. या दिवशी ‘आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा’ असे घोषवाक्य करण्यात आले आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबविषयक आरोग्य चाचणी करून उपचार घेण्यासाठी मुंबईकरांनी पालिकेचे दवाखाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि मुंबई महापालिकेमार्फत २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे. त्यापैकी ७२ टक्के नागरिक हे सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. उपचार घेणाऱ्या नागरिकांपैकी फक्त ४० टक्के नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचे आढळून आले. यामध्ये सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे निदर्शनास आले. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रुग्णांचे वेळीच निदान होऊन त्यांना प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यांच्यामध्ये जागरूकता करणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचार पद्धतीचा अवलंब करणे; तसेच रुग्णांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिका दवाखाना व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते. सुमारे एक लाख दहा हजार रुग्ण नियमितपणे उच्च रक्तदाब संदर्भातील उपचार घेत आहेत. उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांनी आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी रक्तदाबाची नियमित तपासणी आणि उपचार घ्यावा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.
२६ रुग्णालयांमध्ये तपासणी केंद्र
३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरित्या चाचणी करण्याच्या दृष्टीने पालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२ पासून मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत ३ लाख ५० हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी ९.७ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब संशयित आढळून आले. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
३० वर्षांवरील नागरिकांचे सर्वेक्षण
जानेवारी २०२३ पासून पालिकेच्या वतीने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका /आशासेविकांमार्फत ३० वर्षांवरील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत अंदाजे १८ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १७ हजार उच्च रक्तदाब रुग्ण आढळून आले असून उपचाराधीन आहेत.
समुपदेशन केंद्र
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना आहाराविषयक सल्ला देण्याची/ समुपदेशन सेवा पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २१ हजार उच्च रक्तदाब रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली संदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभागात पालिकेद्वारे चालू केलेले योगा केंद्राचा लाभ मुंबईकर घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.