ई-चलन मशीन खासगी व्यक्तीच्या हाती

ई-चलन मशीन खासगी व्यक्तीच्या हाती
Published on

ई-चलन मशीन खासगी व्यक्तीच्या हाती
‘आरटीओ’ अधिकाऱ्याचा अजब कारभार; कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : बीड येथे काही दिवसांपूर्वी तोतया आरटीओ अधिकारी, एक वाहनचालक पकडला गेला. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही करण्यात आली. असाच प्रकार देवनार येथे घडला आहे. मुंबईत आरटीओ अधिकारी गाडीत बसून आहेत तर खासगी व्यक्तीच्या हातातील ई-चलन मशीनने कारवाई केली जात आहे. सचिन पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आरटीओ अधिकारी सचिन पाटील हे शासकीय वाहनात बसले असल्याचे दिसत आहे तर त्यांचे ई-चलन मशीन खासगी वाहनचालकाच्या हाती दिसत आहे. त्याने शासकीय खाकी वर्दीही परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच, तो शासकीय कारवाई करीत होता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे खासगी व्यक्तीला शासकीय गणवेश देऊन, त्याला शासकीय कारवाई करण्याच्या सूचना कोणी दिल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी व्यक्तीने शासकीय गणवेश घालणे गुन्हा असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली. याबाबत एका शिवसैनिकाने परिवहनमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

परिवहन विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. वैभव फडतरेसारखे शेकडो ‘दलाल’ परिवहन विभागासाठी वसुलीचे काम करीत आहेत. परिवहन अधिकारी नेहमीच मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे करतात आणि एकीकडे अशा दलालांना घेऊन स्वतःचे खिशे भरतात. हे महाराष्ट्र राज्याच्या परिवहनमंत्र्यांचे अपयश आहे. परिवहन अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा ताबा राहिलेला नाही.
- प्रदीप वाघमारे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
===
सचिन पाटील यांच्याबाबतचा व्हिडिओ मी पाहिला आहे. सहपरिवहन आयुक्तांना याबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

खासगी व्यक्तीने शासकीय कर्मचाऱ्याचा गणवेश घालून, शासकीय वाहन चालवणे हा मोठा गुन्हा आहे. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून सत्यता पडताळून संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com