

रेल्वे हद्दीतील सफाईवरून स्थायी समितीत रणकंदन
प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्याचा सदस्यांचा गंभीर आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रेल्वे हद्दीतील नाले आणि कल्व्हर्ट (मोऱ्या) सफाईसाठी महापालिका दरवर्षी रेल्वे प्रशासनाला कोट्यवधी रुपये देते; मात्र प्रत्यक्षात ही सफाई होतच नसल्याचा घणाघाती आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. सफाईसाठी अत्याधुनिक मशीन्स वापरली जात असल्याचे प्रशासन सांगते; पण या मशीन्स आजवर कोणीच पाहिल्या नाहीत, अशा शब्दांत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
शिक्षण समिती सभापती राजश्री शिरवडकर यांनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, की २०१९ मध्ये प्रशासनाने कल्व्हर्ट सफाईसाठी रिमोटवर चालणाऱ्या अत्याधुनिक मशीन्स घेतल्याचे सांगितले होते; मात्र माझ्या प्रभागात अशा मशीन्सद्वारे कधीच सफाई झालेली दिसली नाही. या सफाईवर आम्हाला संशय असून, प्रशासनाने सर्व सदस्यांना या मशीन्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवावे.
भाजप नगरसेविका प्रीती साटम यांनीही कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्या प्रभागात रेल्वे लाइनचे मोठे जाळे आहे. अनेक नाले रेल्वे हद्दीतून जातात; पण तिथे मशीनने सफाई झालेली मी कधीही पाहिलेली नाही. हे काम नेमकी कोणती कंपनी करते, याची माहितीही आम्हाला दिली जात नाही. आतापर्यंत किती नाल्यांची सफाई पूर्ण झाली, याचा लेखाजोखा प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपच्याच शीतल गंभीर यांनी प्रशासकीय धोरणावरच प्रश्न उपस्थित केला. शहरासाठी नऊ आणि उपनगरांसाठी १५ अत्याधुनिक मशीन्स असताना आणि रेल्वेलाही पैसे दिले जात असताना, पुन्हा पालिकेने यावर खर्च का करावा, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर राष्ट्रवादीच्या डॉ. सईदा खान यांनी ठरावीक भागातच सफाई का होते, असा सवाल करत संपूर्ण रेल्वे परिसरात समान स्वच्छता राखण्याची मागणी केली. तसेच, बाहेरून कंत्राट देण्याऐवजी पालिकेने स्वतःची कायमस्वरूपी यंत्रणा का उभारली नाही, अशी विचारणा करत अडचणीच्या ठिकाणांसाठी छोट्या मशीन्स घेण्याचा सल्ला दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशरफ आझमी यांनी प्रशासनावर हल्लाबोल करताना सांगितले, की मी कधीही मशीनने सफाई होताना पाहिले नाही, उलट कामगार हातानेच (मॅन्युअली) कचरा काढताना दिसतात. केवळ कल्व्हर्टच नाही, तर मिठी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. पावसाळ्यापूर्वी मिठी नदी साफ करण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार, असा सवाल त्यांनी केला.
भाजपच्या राखी जाधव यांनी डोंगराळ भागातून येणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मांडला. पश्चिमेकडून आणि डोंगरावरून येणारा कचरा पूर्व उपनगरातील नाल्यांमध्ये अडकतो. यामुळे पाणी साचते. हा कचरा रोखण्यासाठी नाल्यांच्या तोंडावर आणि मध्यभागी लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
या गोंधळावर स्पष्टीकरण देताना अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी सांगितले, की २०१९ मध्ये घेतलेल्या मशीन्सचे कंत्राट २०२२ मध्ये संपले. त्यानंतर २०२५ पर्यंतचे नवीन कंत्राट देण्यात आले होते. आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कल्व्हर्ट रेल्वे हद्दीत असले तरी, शहरात पाणी तुंबू नये म्हणून त्यांची सफाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. प्रशासनाच्या या उत्तरावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली; मात्र अखेर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.