

भंगारविक्रीत मध्य रेल्वे अव्वल
सहा महिन्यांत ३२३.५० कोटींचे उत्पन्न; यार्ड, डेपोची जागाही मोकळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : रेल्वे यार्ड, डेपो आणि कार्यशाळांमध्ये पडून असलेल्या भंगाराचे उत्पन्नात रूपांतर करत मध्य रेल्वेने विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मध्य रेल्वेने तब्बल ३२३.५० कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री केली. देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये ही सर्वाधिक विक्री ठरली आहे. सप्टेंबरमध्ये ७०.४२ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करत मध्य रेल्वेने आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली.
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ मोहिमेदरम्यान मध्य रेल्वेने ४,८८४ मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट लावली. त्याची किंमत ४४.२४ कोटी रुपये आहे. १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत रेल्वे परिसरातील साचलेले भंगार आणि कालबाह्य मालमत्ता शोधून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर या साहित्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्यात आली.
जुनी इंजिने, डबे आणि वॅगन्सही हटविले
चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली. यात २९,९९३ मेट्रिक टन रूळ व परमनंट-वे भंगार, एक लाख ७२ हजार १९५ स्लीपर्स, १५,५४७ मेट्रिक टन लोहयुक्त भंगार आणि १,९९९ मेट्रिक टन लोहविरहित भंगाराचा समावेश आहे. तसेच २३ इंजिने, ६२ डबे आणि ७० वॅगन्सचीही विल्हेवाट लावण्यात आली. ४६.८५ मेट्रिक टन ई-कचऱ्याचीही विल्हेवाट करण्यात आली असून, त्यातून १.११ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
भुसावळ विभाग आघाडीवर
३२३.५० कोटी रुपयांच्या भंगारविक्रीत भुसावळ विभागाचा वाटा सर्वाधिक आहे. या विभागाने ५७.२७ कोटी रुपयांची विक्री केली. त्यानंतर मुंबई विभाग ५२.०८ कोटी, पुणे ४७.५५ कोटी, नागपूर ४६.०८ कोटी आणि सोलापूर विभागाने १४.६९ कोटी रुपयांची भंगार विक्री केली. उर्वरित रक्कम मध्य रेल्वेवरील इतर डेपोमधून मिळाली.
यार्ड, डेपोची जागा मोकळी
भंगाराची विल्हेवाट लावल्यामुळे रेल्वे यार्ड, कार्यशाळा, डेपो आणि रेल्वेमार्गालगतचा परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर भंगारामुळे व्यापलेली रेल्वेची मौल्यवान जागाही मोकळी झाली. पुनर्वापरयोग्य साहित्याची विक्री करून महसूल मिळविण्याबरोबरच पर्यावरणपूरक भंगार व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात येत आहे.
विभागनिहाय विक्री
भुसावळ विभाग - ५७.२७ कोटी
मुंबई विभाग - ५२.०८ कोटी
पुणे विभाग - ४७.५५ कोटी
नागपूर विभाग - ४६.०८ कोटी
सोलापूर विभाग - १४.६९ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.