आदिवासी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी

आदिवासी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी
Published on: 

आदिवासी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी
आंदोलनाला भाजप सरकार घाबरल्याची काँग्रेसची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भाजप सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारून अन्याय केला आहे. त्यातच भाजप सरकार व पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप काँग्रेसने केली आहे.

‘मागील दोन वर्षांत आश्रमशाळेतील ६०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, याची निष्पक्ष चौकशी करावी, आदिवासी विकास मंत्री यांचा राजीनामा घ्यावा, आदिवासी आयुक्त यांची बदली करावी. मूलभूत सुविधा मिळाव्यात, सेंट्रल किचनमधून येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसतो, आमच्या मुलामुलींना पोलिस त्रास देत आहेत. आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अन्यथा राज्यपाल यांना भेटू द्यावे, आम्हाला आमच्या समस्या मांडायच्या आहेत,’ अशी भूमिका टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेत नाशिकहून मुंबईत लाँग मार्च काढला. आदिवासी विद्यार्थी ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, मुंबईच्या जवळ त्यांचा लाँग मार्च येताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांची काँग्रेसने त्यांच्या पक्ष कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली असता मध्यरात्रीच पोलिसांनी त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला, बाथरूममध्ये घुसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. या वेळी टिळक भवनात प्रवेश करून दडपशाही का केली, असा जाब काँग्रेस नेत्यांनी विचारला. बेकायदा पक्ष कार्यालयात शिरलात का व कशासाठी याचे समाधानकारक उत्तर पोलिसांना देता आले नाही. काँग्रेस पक्ष आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व यापुढेही त्यांच्या पाठीशी उभे राहणार, असे काँग्रेसने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांची अखेर घरवापसी
विविध मागण्यांसाठी गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आज (ता. ६) सांगता झाली. नाशिकहून हे विद्यार्थी राजभवनाला धडक देण्यासाठी पायी मुंबईत दाखल झाले होते. या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची तात्पुरती मुक्कामाची सोय दादर येथील टिळक भवन आणि पालिकेपुढील काँग्रेस कार्यालयात केली होती, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यातून सोमवारी मध्यरात्री या दोन्ही कार्यालयांतून या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपालांना भेटू देण्याची त्यांची मागणी होती, मात्र आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांना आम्ही धुळे, नाशिक, नंदुरबारपर्यंत सोडून देणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

समन्वयाची भूमिका
दोन दिवस टिळक भवनला पोलिसांचा वेढा होता, असे चित्र होते. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या यापूर्वी मान्य केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. सकाळपासून पोलिस आणि विद्यार्थ्यांची बोलणी सुरू होती. टिळक भवनच्या बाहेर पडल्यावर आम्ही त्यांना अटक करू, अशी पोलिसांची भूमिका होती. शेवटी यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांनी घरी जाण्याची तयारी दाखवली. पोलिसांनी जवळपास १० ट्रॅव्हल बसची सोय केली होती. मुंबईबाहेर नव्हे, तर त्यांच्या शहरापर्यंत सोडून देण्याची तयारी मुंबई पोलिसांनी दाखवली. दुपारी हे सर्व विद्यार्थी या बसमधून रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com