कामगारांच्या सुरक्षा, सन्मानासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : आकाश फुंडकर

कामगारांच्या सुरक्षा, सन्मानासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : आकाश फुंडकर
Published on: 

कामगारांच्या सुरक्षा, सन्मानासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : आकाश फुंडकर
‘ओएसएच इंडिया २०२६’चे मुंबईत उद्‍घाटन; ३०० हून अधिक ब्रँड्सचा सहभाग

मुंबई, ता. ८ : महिलांना आवश्यक सुरक्षा उपायांसह रात्रपाळीत काम करण्याची मुभा, कागदविरहित प्रशासन आणि नवीन कामगार संहितेच्या माध्यमातून उद्योगसुलभता व कामगार संरक्षण यांचा समतोल साधला जात आहे, असे राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियातर्फे मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे कार्यस्थळावरील सुरक्षा आणि व्यावसायिक आरोग्याला वाहिलेल्या ‘ओएसएच इंडिया २०२६’च्या १४व्या आवृत्तीचे उद्‍घाटन झाले. या वेळी फुंडकर बोलत होते. औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीसोबतच कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या क्षमतेचा विस्तार करून मोठ्या प्रमाणावर सुरक्षित रोजगार निर्माण करणे हे राज्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात अमेरिका, चीन, जपान, ब्रिटनसह १३ हून अधिक देशांतील ३०० हून अधिक ब्रँड्स सहभागी झाले आहेत. कार्यस्थळावरील सुरक्षा, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध तंत्रज्ञान व साधनांचे प्रदर्शन येथे करण्यात आले आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा मनोहर देसाई यांनी तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या वाढत्या भूमिकेवर भर दिला. कारखाना, बंदर किंवा रिफायनरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची आणि विश्वासाची जपणूक करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची वस्त्रोद्योग बाजारपेठ १९६ अब्ज डॉलरवरून लवकरच ३५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे संशोधनाचे रूपांतर भारतीय हवामान आणि कामगारांच्या गरजांना अनुकूल अशा अत्याधुनिक सुरक्षा साधनांमध्ये व कपड्यांमध्ये करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अतिरिक्त संचालक राम दहीफळे यांनीही तंत्रज्ञानाधिष्ठित सुरक्षेवर भर दिला. उत्पादन क्षेत्र अधिकाधिक तंत्रज्ञानाधारित होत असताना सुरक्षेची मानके आणि कामगारांची कौशल्येही त्याच वेगाने अद्ययावत होणे आवश्यक आहे. सुरक्षा ही केवळ एखाद्या अधिकाऱ्याची किंवा विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण संस्थेची सामूहिक संस्कृती बनली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com