

बिग बी, महापौर, उपमहापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी
शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर स्फोट घडवण्याचा ई-मेल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यासह, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ई-मेल शुक्रवारी (ता. २३) दुपारी सव्वातीन वाजता प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. तसेच ३१ ऑक्टोबरला एका शाळेवर ग्रेनेड हल्ल्याची, तर २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या गायक दिलजित दोसांज यांच्या कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकीही या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसह संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, धमकीच्या संदेशाची सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे.
‘बॉम्ब ब्लास्ट मेयर मुंबई ऑफिस’ असा विषय असलेल्या या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ आणि ‘बब्बर खालसा’ या संघटनांचा उल्लेख करण्यात आल्याचे समजते. तसेच १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराचा संदर्भ देत धमकीवजा मजकूर लिहिण्यात आला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे स्फोट घडवून आणण्याबरोबरच गायक-दिग्दर्शक दिलजीत दोसांझ यांना लक्ष्य करण्याचाही उल्लेख ई-मेलमध्ये असल्याची माहिती आहे. या धमकीमुळे महापौर कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सर्व ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यापूर्वी १० जून आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसह महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले होते. त्या वेळी सुरक्षा यंत्रणांनी संबंधित ठिकाणांची तपासणी केली होती; मात्र संशयास्पद वस्तू आढळली नव्हती.
---
नवी मुंबईत तीन शाळांना धमकी
नवी मुंबई (वार्ताहर) : विबग्योर स्कूलच्या खारघर, बेलापूर आणि ऐरोली शाखांना शुक्रवारी ‘अपने बच्चे बचाव’ असा धमकीवजा ई-मेल आल्याने खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. यानंतर पोलिसांनी परिसराची कसून तपासणी केली; मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांच्या परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, तिन्ही शाळांना ई-मेल पाठवणारी व्यक्ती कोण आणि या धमकीमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.