

शाळांच्या गच्चीवर फुलणार
सेंद्रिय भाजीपाल्याची बाग!
महापालिकेच्या २०० कार्यानुभव शिक्षकांना विशेष प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि शेतीविषयक कौशल्य विकसित करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे २०० कार्यानुभव शिक्षकांना शालेय परसबाग निर्मिती आणि सेंद्रिय भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
शिक्षणाधिकारी कीर्तिवर्धन किरतकुडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक उद्यान अधीक्षक अविनाश यादव यांनी शिक्षकांना तांत्रिक माहिती दिली. शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत तसेच गच्चीवर परसबाग कशी विकसित करावी, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. परसबागेसाठी योग्य जागेची निवड, मातीची तयारी, सेंद्रिय खतांचा वापर, हंगामानुसार भाजीपाल्याची लागवड, पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण याबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली. कमी जागेतही भाजीपाला उत्पादन घेण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या.
शालेय परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा, सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय लागावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिक्षकांच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये परसबागा विकसित झाल्यास विद्यार्थ्यांना कृतीतून निसर्ग आणि शेतीचे धडे मिळणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.