माथेरानमध्ये हॉटेलला आग

माथेरानमध्ये हॉटेलला आग
Published on

माथेरान, ता. १० (बातमीदार) ः शहरात बाजारपेठेतील एका हॉटेलमधील रूममध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी घडली. यात जीवितहानी टळली असली तरी मोठे नुकसान झाले आहे.
हॉटेल मेजवानीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजिंगमधील एका रूमला आग लागल्याचे रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आले. त्‍यानंतर हॉटेल व्यवस्‍थापनाने आग विझवण्यासाठी प्रयत्‍न केले. बाजूच्या सॅकविल हॉटेलचा मालक यतीश तावडे यांनी आपल्‍याकडील पाण्याच्या टाकीला मोटरद्वारे पाइप जोडून कामगारांच्या मदतीने घटनास्थळापर्यंत पाणी उपलब्ध केले. तर शशी नायक या तरुणाने प्रसंगावधान राखत, ज्या रूममध्ये आग लागली होती त्‍या खिडकीची काच फोडून आत पाणी फवारणी केल्‍याने आग आटोक्‍यात आणली.
हॉटेलच्या रूममध्ये राहिलेले पर्यटक पंखा सुरू ठेवून फिरायला गेले होते. दरम्‍यान, शॉर्टसर्किटमुळे पंखा तसेच त्यावर असलेल्या ॲक्रेलिक सीलिंग हे प्लॅस्टिकचे असल्याने आगीने पेट घेतला. रूममधील गादी, एसी, टीव्ही, टेबल फॅन तसेच लाकडी कपाट आगीत खाक झाले.
हॉटेल मालक प्रमोद नायक, व्यवस्थापक इमरान महापुळे यांनी त्‍वरित माथेरान नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवले; मात्र अग्निशमनच्या वाहनावर प्रशिक्षित चालक तसेच ऑपरेटरच नसल्याने येण्यास विलंब झाला.

महिनाभरातील चौथी घटना
माथेरान शहरात महिनाभरात घटलेली ही आगीची चौथी घटना आहे; मात्र शहरात अग्‍निशमनचे वाहन नादुरुस्‍त तसेच प्रशिक्षित ऑपरेटर नसल्‍याने नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्‍यावरच नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्‍थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com