

थोडक्यात बातम्या रायगड
वढाव येथील ठाकूर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात
पेण (बातमीदार) : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बळीराम गणा ठाकूर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संदेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जगाची प्रगती मग ती आरोग्य, औद्योगिक, शैक्षणिक असेल ही सर्व प्रगती विज्ञानामुळे झाली आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगावर विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हे या देशातील भविष्यातील वैज्ञानिक आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर चमत्कारामागील विज्ञान आणि भूत, भानामती, आत्मा या विषयावर व्याख्यान दिले. जगदीश डंगर यांनी वैज्ञानिक गाण्याच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक जयवंत म्हात्रे, अपर्णा भगत, नेहा म्हात्रे, संध्या म्हात्रे, गिरीश म्हात्रे आदी उपस्थित होते.
.....................
पेण तालुका ज्येष्ठ नागरिकांच्या सभेला प्रतिसाद
पेण (बातमीदार) : पेण तालुका ज्येष्ठ नागरिकांची सभा संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. सभेत प्रामुख्याने १३ मार्चला असलेल्या वर्धापन दिनाची रूपरेषा ठरविण्यात आली. १३ मार्चला सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत वर्धापन दिनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात ७५ वर्षे वय झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच ज्या जोडप्याला पन्नास वर्षे झालेली आहेत, त्यांचाही सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर व फेस्कॉनचे सदस्य शहा उपस्थित असतील. यावेळी मागील सभेचे इतिवृत्तही वाचून मंजूर करण्यात आले. सभेच्या सुरुवातीस दिवंगत सदस्य व मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षांनी संघाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.
.................
पोयनाड डॉक्टर्स असोसिएशनची शहाबाज वाचनालयास मदत
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावात १०८ वर्षांची परंपरा असलेले सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय आहे. या वाचनालयास नुकतीच पोयनाड डॉक्टर्स असोसिएशनच्या डॉक्टरांनी एकत्र येत आर्थिक स्वरूपाची मदत केली. वाचन संस्कृती समाजापर्यंत रुजावी आणि त्या माध्यमातून नवनवीन पुस्तके वाचनालयास मिळून ती वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने डॉक्टर असोसिएशनने दहा हजार रुपयांचा धनादेश वाचनालयास सुपूर्द केला. या डॉक्टर्स असोसिएशनमध्ये डॉ. विष्णू म्हात्रे, डॉ. राकेश बाफना, डॉ. युगेश पाटील, डॉ. प्रशांत बैकर, डॉ. मकरंद पाटील यांचा समावेश होता. या सर्व डॉक्टरांचे वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने निवृत्ती पाटील, मंगेश भगत, प्रवीण पाटील, ग्रंथपाल सचिता पाटील, मनीष पाटील यांनी स्वागत केले.
...................
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
माणगाव (वार्ताहर) : अध्ययन व अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यक्रमातील जटिल संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून माणगाव व तळा तालुक्यातील २२ माध्यमिक शाळांना संगणकीय पाठ्यक्रम संचित किट, प्रोजेक्टर, स्क्रीन व इतर पूरक साहित्य वाटप कार्यक्रम विघवली हायस्कूल येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी सुश्राव्य ईशस्तवन व स्वागतगीत गायन केले. उपस्थित मान्यवरांमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू विलास म्हात्रे, महादेव बक्कम, ॲड. महेंद्र मानकर, ज्ञानेश्वर मगर, नामदेव शिंदे, समन्वयक राजा पवार, रोहित मुंढे, विशाल पाटील, विनायक गुळवणी यांचा मुख्याध्यापक पांडुरंग उभारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते माणगाव व तळा तालुक्यातील २२ शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कोकण विभागातील एकूण पाच हजार शाळांपैकी यावर्षी एक हजार शाळांना हे शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. यापुढे अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य सर्वच शाळांना टप्प्याटप्प्याने वाटप केले जाईल, असे विलास म्हात्रे यांनी सांगितले. दिलेल्या साहित्याचा आपण वापर करावा, अशीही विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजा पवार तर सूत्रसंचालन कृष्णा पानवकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.