

महाविकास आघाडीला नैतिक अधिकार नाही : आनंद परांजपे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन करण्यात येते; मात्र महाविकास आघाडीत ठाकरे गटाची मागणी दोन्ही पक्ष मानत नाहीत. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे विचारण्याचा नैतिक अधिकार महाविकास आघाडीला नाही. अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.
कळवा-मुंब्राच्या विकासासाठी आणलेल्या विकासनिधीची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी मविआवर टीका केली, तर कळवा-मुंब्राच्या विकासासाठी महायुती सरकारने १८१ कोटींचा निधी दिल्याची माहितीदेखील त्यांनी या वेळी दिली. बुधवारी सकाळी महायुतीच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीकडूनदेखील महायुतीने चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांना विचारले असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने म्हविकास आघाडीतील नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत आहे; मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असतील किंवा शरद पवार आणि जयंत पाटील हे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांनी महायुतीचा चेहरा कोण हे विचारण्याचा नैतिक अधिकार महाविकास आघाडीला नसल्याचे म्हटले.
जितेंद्र आव्हाडांवर टीका
टोलमाफीचा निर्णय सरकारने घेतल्याने टोलचा भुर्दंड वाचला, जनतेला दिलासा मिळाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड टक्केवारीत काम घेत असतात, असा आरोप नजीब मुल्ला यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी विकासाला गती देण्याचे काम केले आहे, तसेच आव्हाड यांनी जर कामे केली आहेत, तर बॅनर लावण्याची गरज का, असा सवालदेखील मुल्ला यांनी या वेळी उपस्थित केला. अडीच वर्षे मंत्री असताना विशेष निधी ते त्यांच्या मतदारसंघात आणू शकले नाहीत. निधी आणल्यावर आम्ही आमच्या कामाची घोषणा करत आहोत, आधी फक्त घोषणा केल्या जायच्या प्रत्यक्ष काहीच होत नसे, अशी टीकादेखील नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर केली.
१८१ कोटींचा निधी
कळवा-मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विकास निधी मिळत नसल्याची ओरड करण्यात येत आहे; मात्र महायुती सरकारने या मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल १८१ कोटींचा निधी दिल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले. यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे प्रयत्नाने ५५ कोटींचा निधी दिला. त्यानंतर पुन्हा ५० कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर आता नुकतेच ४० कोटींचा निधी दिल्याचे सांगत, या निधीतून कळव्यातील नागरिकांना हक्काचे भूमिपुत्र मैदान बनवले जाणार आहे. आगरी कोळी भवन, दफनविधी, इतर समाजाच्या स्मशानभूमी, माध्यमिक शाळा उभारण्यात येणार आहेत. मुंब्रा- कौसा येथील स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.