खोपट एसटी आगाराला असुविधांचा वेढा

खोपट एसटी आगाराला असुविधांचा वेढा
Published on

खोपट आगाराला असुविधांचा वेढा
गर्दुल्ले, भिकाऱ्यांचे बस्तान

ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) : खोपट एसटी आगार आणि वाहतूक चालक विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. बीयुटी तत्त्वावर बांधलेल्या आगारातील स्टॉलधारकांची दादागिरी वाढली आहे. त्यांच्याकडून एसटीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. विश्रामगावातील बसचालक, वाहकांना ऐन हिवाळ्यात अंथरून-पांघरून नसल्याने त्यांच्यावर उघड्यावर झोपण्याची वेळ आली आहे. हे आगार आणि विश्रामगृह महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे मॉडेल म्हणून गणले जावे, अशी इच्छा व्यक्त करत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगारासाठी महामंडळाला कोट्यवधीचा निधी दिला होता; मात्र त्यानंतरही आगाराची दुरवस्था कायम असल्याचे चित्र आहे.

ठाण्यातील खोपट एसटी आगाराचा महाराष्ट्राच्या विकासात वाटा आहे. ठाण्यातील या मुख्य आगारातून महाराष्ट्राच्या जिल्हा प्रवाशांची वाहतूक केली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील एसटीच्या कामासाठी महामंडळाला ६०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याची घोषणा त्यांनी खोपट आगाराची पाहणी करण्यासाठी आले असता येथील दुरवस्था पाहून त्यांनी केली होती. त्या निधीच्या वाट्यातून खोपट एसटी आगारात विविध सुविधा निर्माण करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला दिले होते. हा निधी देताना खोपट आगार महाराष्ट्रात सर्व आगारांचे मॉडेल बनेल, अशा पद्धतीने त्याचा विकास करावा, अशी तंबी दिली होती.

दरम्यान, आताच्या सरकारमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्रिपदाची शपथ घेताच त्याच रात्री उशिरा खोपट आगाराला भेट देत आगार आणि विश्रामगृहाची पाहणी केली होती. तेथील दुरवस्था पाहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. त्यानंतरही या आगाराची दुरवस्था दूर झालेली नाही. प्रवासी आणि वाहक, चालकांसाठी बांधलेल्या शौचालयात अत्यंत अस्वछता असून, दुर्गंधी पसरली आहे. पायऱ्यांवर कोपऱ्यात पान, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकलेले डाग आहेत. पिण्याच्या पाण्याच्या जागेतदेखील घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

दुकानदारांचे अतिक्रमण
विश्रामगृहात अस्वच्छता आहे. वाहक, चालकांना ऐन थंडीत विनाअंथरून, पांघरुणाविना झोपावे लागत आहे. आगारात बाहेरील दुकानदारांना स्टॉल भाड्याने दिले आहेत. त्यांनी दुकानासमोरच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

चोऱ्यांचे प्रमाण वाढले
खोपट एसटी आगारामध्ये रात्रीच्या वेळी प्रवासी बसण्याच्या जागेवर गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे बस्तान असते. अनेकदा येथे बसलेल्या गर्दुल्ल्यांमध्ये आपसात मारामाऱ्या होतात. प्रवाशांच्या सामानांच्या चोऱ्या होत असल्याचाही तक्रारी आहेत. गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांकडे पत्रव्यवहार केल्याचे एसटी अधिकारी सांगतात.

स्टॉलधारकांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी अतिक्रमण हटवले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी अंतिम नोटीस गाळेधारकांना पाठवण्यात आली असून, स्वच्छतेसाठी नवीन निविदा मागविली आहे.
-विठ्ठल पतंगे, स्थानक निरीक्षक, खोपट आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com