

बदलापूर, ता. १० (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या गर्दीतील स्थानकांपैकी एक बदलापूर स्थानकातून आता सकाळच्या वेळी प्रवाशांचा गारेगार प्रवास होणार आहे. येत्या १६ एप्रिलपासून सकाळी १०.४२ची लोकल ही एसी लोकल म्हणून बदलापूर स्थानकातून रवाना होणार असून, ऐन उन्हाळ्यात बदलापूरकरांना थंडगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
बदलापूर हे रेल्वे स्थानकावरून रोज दीड लाख प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केल्या होत्या. सुरुवातीला तिकिटाचे दर जास्त असल्याने बदलापूरकरांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली. ज्या लोकल सुरू झाल्या होत्या, त्या मध्य रेल्वेने बंद केल्या. मात्र, आता हळूहळू बदलापूरकरही एसी लोकलना पसंती देत आहेत. त्या अनुषंगाने सकाळच्या वेळेत एक एसी लोकल असावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे मध्य रेल्वेकडून बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सकाळी १० वाजून ४२ मिनिटांनी सुटणारी लोकल आता एसी लोकल म्हणून चालवली जाणार आहे. या संदर्भातील पत्र मध्य रेल्वेने बदलापूर स्टेशन मास्तर कार्यालयात दिले आहे. येत्या १६ एप्रिलपासून सकाळच्या वेळेतील ही लोकल एसी जलद लोकल म्हणून बदलापूर स्थानकातून १०.४२ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी लोकल १२ वाजून १२ मिनिटांनी पोहचेल. यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत बदलापूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर बदलापूर स्थानकातून रात्रीच्या वेळेत ११ वाजून ४ मिनिटांनी ठाणे स्थानकात जाणारी लोकलही १६ एप्रिलपासून एसी लोकल म्हणून चालवण्यात येणार असल्याची माहिती बदलापूर रेल्वे स्थानकातून देण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून बदलापूर शहराच्या दळणवळणाच्या सुविधेत काय बदल करता येईल, यासाठी प्रवाशांशी संवाद साधत आहे. अशा वेळी ऐन उन्हाळ्यात सकाळच्या वेळेत बदलापूर स्थानकातून एक तरी एसी लोकल असावी अशी मागणी होत होती. रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य केल्याने रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो.
- राम पातकर, माजी नगराध्यक्ष, बदलापूर
वातानुकूलित लोकलबाबत उपनगरी प्रवाशांमध्ये द्विधा अवस्था आहे. बऱ्यापैकी उत्पन्न आणि पगार असलेले प्रवासी एसी लोकलकडे आकर्षित होत आहेत. अल्प उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांचा मात्र या लोकल विरोध आहे. त्यामुळे १०.४२च्या लोकलला आमचा विरोध नाही; पण सामान्य प्रवाशांचा विचार करता, मध्य रेल्वेच्या ताफ्यात तत्काळ किमान सहा साध्या लोकल नवीन यायला हव्यात. यामुळे निदान गर्दीच्या वेळी ठाणे आणि कल्याणवरून कर्जत, कसारा लोकल वाढवता येतील.
- मनोहर शेलार, वांगणी रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष
उपनगरीय प्रवासी सल्लागार समिती, मध्य रेल्वे
वातानुकूलित लोकलला विरोध करण्यापेक्षा आम्ही त्या जोडीला नवीन साध्या लोकलची मागणी करत आहोत. बदलापूर ते मुंबई एसी लोकलच्या वाढीव तिकीट दरात मध्य रेल्वेने घट करावी. जेणेकरून एसी लोकलसाठी प्रवासी संख्या वाढेल. १०.४२ची लोकल ही सकाळी गर्दीच्या वेळेतील नसल्याने त्याला विरोध नाही. आम्ही जास्तीच्या साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाला करत आहोत.
- रमेश महाजन, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सहकारी संस्था बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.