

ऑपरेशन प्रहारअंतर्गत ४० लाखांचा गांजा जप्त
नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहारअंतर्गत केलेल्या जोरदार कारवाईत सुमारे २० किलो ७०० ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम असा तब्बल ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एकाच दिवशी ४८ ठिकाणी छापे टाकून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलिस आयुक्त संजय येनपुरे आणि अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांनी नशामुक्त नवी मुंबई या संकल्पनेच्या अनुषंगाने अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन प्रहारअंतर्गत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या भागांमध्ये शुक्रवारी (ता. २३) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी ४८ संशयित विक्रेत्यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या घरांची तपासणी केली. त्यातील सात जणांच्या घरात गांजा हा अमली पदार्थ आढळला. काही विक्रेत्यांनी घरामध्ये खड्डा तयार करून त्यात गांजा पुरून ठेवला होता, तो सुद्धा पोलिसांनी शोधून काढला आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे २० किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम असा तब्बल ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच विक्रीसाठी गांजा या अमली पदार्थाचा साठा करून ठेवणाऱ्या सात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून उर्वरित फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांची अमली पदार्थ विरोधी मोहीम यापुढेही अशाच तीव्रतेने सुरू राहणार आहे. नागरिकांनी पोलिसांच्या नशामुक्त नवी मुंबई या अभियानात सहभागी व्हावे, तसेच अमली पदार्थासंबंधीची माहिती ८८२८-११२-११२ या हेल्पलाइनवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा पर्दाफाश
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एप्रिल महिन्यातही दोन कोटी ७२ लाख रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करत आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात कस्टम अधिकारी, पोस्ट ऑफिस कर्मचारी, अंगडीया आणि दोन पोलिस अंमलदारांचाही समावेश होता. आरोपी डार्क वेबच्या माध्यमातून गांजाची परदेशातून तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.