भिवंडी-वाडा पाण्याखाली जाणार

भिवंडी-वाडा पाण्याखाली जाणार
Published on

वज्रेश्वरी, ता. २५ (बातमीदार) : बहुचर्चित व वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या भिवंडी-वाडा महामार्गाचे काम वर्षभरापासून निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. याशिवाय, हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने यंदाही प्रवासी आणि वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पावसाळा तोंडावर आला असून महिनाभरापासून हा मार्ग खोदलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे यंदा हा रस्ता अंबाडी-कुडूस दरम्यान पाण्याखाली जाणार आहे. या पाण्यातूनच वाहनचालकांना वाट काढावी लागणार आहे.
भिवंडी-वाडा महामार्गाचे काम ईगल कंपनीला देण्यात आल्याचे समजते. या कंपनीकडून हा मार्ग गेल्या महिन्यापासून खाेदलेल्या अवस्थेत आहे. भिवंडी-वाडा महामार्गाच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता राखून काम जलदगतीने होण्यासाठी अनेक वेळा नागरिकांनी भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. खोले यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक घेत तत्काळ रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, अद्याप हा रस्ता धूळ खात पडला आहे. कुठे मोठे भराव, कुठे खड्डे, कुठे धूळ पडलेली, कुठे रस्ताच गायब असे चित्र आजघडीला भिवंडी-अंबाडी-वाडा रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे, तरी सुद्धा हा रस्ता अर्धवट आहे. यंदाही हा रस्ता पाण्याखाली बुडून येथील दळण वळण ठप्प होणार आहे. तर अपघाताची पावसाळ्यात मालिका सुरू होणार असल्याचे प्रवासी व नागरिकांकडून बोलले जात आहे.

कोट्यवधी रुपये वाया जाण्याची भीती
भिवंडी ते वाडा महामार्गावर बोरपाडा, पारिवली, महापोली, लामाज, रवडी, अंबाडी, दुर्गाडा फाटा या ठिकाणी एका बाजूचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील माती, धुळीमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्‍भवत आहेत. सुरू असलेले खोदकाम निविदेनुसार होत आहे किंवा नाही? तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये पुन्हा वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रस्त्याला तडा
नुकत्याच तयार झालेल्या काँक्रीटच्या रस्त्याला तडा गेलेला दिसून येत आहेत. त्यावर योग्य ती संरचनात्मक चाचणी करून सबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com