

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १ : वादळामुळे लवकर आलेल्या पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली आहे. लवकरच पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. महापालिकेने हद्दीमध्ये अनेक विकासकामे हाती घेतली आहेत, परंतु अनेक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू आहेत. रस्त्याच्या शेजारी ही कामे सुरू असल्याचे दिसत असून, कोंडी होत आहे. जर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर पावसाळ्यात हाल सहन करावे लागतील, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
वसई-विरार शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. मॉन्सूनपूर्व तयारी करताना नालेसफाई, रस्ते उंच करणे, मार्गावर छोटे पूल तयार करणे यासह अन्य कामे हाती घेतली आहेत, तर आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडादेखील तयार करण्यात आला आहे, परंतु यातील अनेक कामे संथ, धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावर साहित्य पसरले आहे. वाहतुकीसाठी एक मार्ग बंद ठेवला आहे. त्यामुळे एकाच मार्गावरून ये-जा करणारी वाहने धावत आहेत. याचा फटका अत्यावश्यक सेवांनादेखील बसत आहे.
विरार नारंगी रेल्वे फाटकातून नागरिकांना आजही प्रवास करावा लागतो, मात्र सतत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे फाटक पार करताना अवजड आणि हलक्या वाहनांना गैरसोय निर्माण होते. त्यामुळे विरार पूर्व-पश्चिम जोडला जाणारा उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला यश आले. या उड्डाणपुलाचे कामदेखील सुरू झाले, परंतु अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रहदारीसाठी हा पूल केव्हा खुला होणार, याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.
चालताना धोका
अरुंद रस्ता असून, पुलाच्या खाली मातीचे ढिगारे, खडी पसरली आहे. त्यामुळे वाहने चालवताना धोका निर्माण झाला आहे. त्यातच पावसाला सुरुवात झाली, तर हा पूर्ण मार्ग चिखलमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास करणे अडचणीचे ठरणार आहे. एकीकडे पर्यायी मार्ग म्हणून या पुलाकडे पाहिले जात आहे, जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, परंतु गेली काही वर्षे या पुलाचे काम सुरू आहे, ते आजतागायत कायम आहे.
पुलामुळे कोंडीमध्ये भर
दुसरीकडे नालासोपारा पश्चिम येथील समेळ पाडा येथील शिवमंदिर मार्गावर नवीन छोटा पूल तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. या कामाला काही महिने उलटले आहेत. येथील एका मार्गाचे काम सुरू असल्याने रहदारीसाठी बांधकाम विभागाने बंद ठेवला आहे. त्यामुळे नालासोपारा शहरात वर्दळीचा समजला जाणाऱ्या या रस्त्यावर एकतर्फी वाहतूक होत असल्याने कोंडी निर्माण होत आहे, तर यासह विविध भागात अशीच कामे सुरू आहेत. त्यामुळे मार्ग तोकडे आणि पसारा अधिक, अशी परिस्थिती दिसून येत आहे.
उड्डाणपुलाचे जाळे केव्हा होणार?
एकीकडे विरार येथील रेल्वेवरून जाणारा उड्डाणपूल अद्याप पूर्ण झाला नाही, मात्र वसई-विरार शहरात उड्डाणपुलाचे जाळे निर्माण करणार, अशी घोषणा केली जात आहे, मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे केवळ कागदावरच उजळणी की प्रत्यक्षात उड्डाणपूल लवकर उभारले जातील, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
वसई-विरार महापालिका विविध विकासकामे करत आहे, जेणेकरून नागरिकांना चांगली सुविधा मिळेल, मात्र ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली नाही, तर नागरिकांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.
- प्रकाश पाटील, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.