

पालिकेत विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप सुरू करावी
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रम आणि महापालिकेच्या विद्युत व अभियांत्रिकी विभागामध्ये तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते विकास सोरटे यांनी केली आहे. यासंदर्भात सोरटे यांनी आयुक्त, महापौर व परिवहन समिती सभापती यांना निवेदन दिले आहे.
नवी मुंबई परिसरात सध्या अंदाजे तीन आयटीआय, नऊ पॉलिटेक्निक व सात अभियांत्रिकी महाविद्यालये कार्यरत असून, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासावर मर्यादा येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, परिवहन उपक्रम आणि विद्युत व अभियांत्रिकी विभागामध्ये अप्रेंटिसशिप योजना सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढेल आणि रोजगाराच्या संधी अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.