

मोठागाव रिंगरोड प्रकल्पाला विरोध
जमीन संपादनाच्या रकमेवरून तणाव; रोख भरपाईची मागणी
डोंबिवली, ता. २ : मोठागाव येथील रिंगरोड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १) महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांची भेट घेतली. या प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या बदल्यात ‘टीडीआर’ नको, तर रोख रक्कम स्वरूपात मोबदला द्यावा, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
मोठागाव येथील रिंगरोड कामात सुमारे साडेपाच हेक्टर जमीन बाधित होत आहे. शासनाकडून ही जमीन भूसंपादन करताना शेतकऱ्यांना टीडीआर देण्याचे प्रस्तावित आहे; मात्र टीडीआर नको, आम्हाला रोख मोबदलाच हवा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमची जमीन कवडीमोल भावाने घेऊन आमच्यावर अन्याय करू नका. यापूर्वीच विविध प्रकल्पांत आमची जमीन गेली असून, आता आमच्याकडे अत्यंत कमी जमीन शिल्लक राहिली आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांची एकत्रित बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणीही या वेळी दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. मध्यंतरी ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीवर भराव टाकला होता, त्यावरूनही शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा
दीपेश म्हात्रे म्हणाले की, मोठागावातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. पालिका प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना रोख मोबदला दिला पाहिजे. शेतकरी विकासाच्या आड येणार नाहीत, पण प्रशासनाने त्यांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांची तर १०० टक्के जमीन संपादित केली जात असल्याने त्यांच्याकडे आता उदरनिर्वाहासाठी काहीही उरलेले नाही.
प्रशासनाची भूमिका
पालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बाधित शेतकऱ्यांना प्रशासन दुप्पट टीडीआर देण्यास तयार आहे; मात्र रोख रक्कम स्वरूपात मोबदला देण्याची सध्या तरी कोणतीही तरतूद नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.