

मिरा-भाईंदर मेट्रोचे लोकार्पण सोमवारी
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर मेट्रो सुरू होण्यासाठी आणखी तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे. आधीच्या नियोजनानुसार मेट्रोचा पहिला टप्पा उद्या (ता. ३) सुरू होणार होता; मात्र आता तो सोमवारी (ता. ६) सुरू होणार आहे. बराच काळ रखडलेल्या मेट्रोच्या काशीगाव ते दहिसर या पहिल्या टप्प्याचे शुक्रवारी (ता. ३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार होते; मात्र अचानक या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हे लोकार्पण सोमवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली. दरम्यान, शहरात येत असलेल्या मेट्रोवरून श्रेयाचे जोरदार राजकारण सुरू झाले असून मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.